सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती बंद असल्याने सोमवारी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे दर कमी निघण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे खाद्यतेलात पुन्हा वाढ झाली आहे. १५ किलोच्या डब्यामागे सरासरी १०० रुपयांची वाढ आहे. दरम्यान, डाळींचे दरही टिकून आहेत.
सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शनिवार आणि रविवारी सातारा बाजार समिती बंद होती. त्यामुळे शेतमाल आलाच नाही. सोमवारी बाजार समिती सुरू राहणार आहे. त्यामुळे मालाची आवक अधिक होईल, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बाजार समितीत कांद्याचा दर कमी झाला असून वाटाणा अधिक भाव खात असल्याचे दिसून येत आहे.
तेल डब्यामागे वाढ
खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मागील आठवड्यात दर स्थिर राहिले होते. मात्र, तेल दरात पुन्हा वाढ झाली आहे. डब्यामागे १०० रुपयांची वाढ आहे. सूर्यफूल आणि शेंगदाणा तेल डबा २,५०० ते २,५५० रुपयांना मिळत आहे. तर सोयाबीन तेल डबा २,१५० ते २२५०, पामतेलचा १,९०० ते २ हजार रुपयांना मिळत आहे.
फळांची आवक कमी
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने फळांची आवक कमी झाली. लॉकडाऊन असतानाही काही ठिकाणी केळी, कलिंगडे विक्री सुरू असल्याचे दिसून आले.
लसणाला दर
बाजार समितीत भाज्यांना कमी दर आहे. गवारला १० किलोला ३०० ते ४०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेवगा शेंगला १०० ते १५०, पावटा ४०० ते ४५० आणि भेंडीला ३०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. लसणाला ६ हजार तर बटाट्याला १,६०० रुपये क्विंटलपर्यंत दर आहे.
दोन दिवसांपासून भाजी मंडई बंद आहे. पण, शुक्रवारीच घरासाठी दोन दिवस पुरेल एवढा भाजीपाला खरेदी केला होता. सध्या काही भाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा मात्र आवाक्यात आहे.
- रामचंद्र पवार, ग्राहक
खाद्यतेलाचे दर मागील आठवड्यात कमी झाले होते. मात्र, या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. कारण, लॉकडाऊनमुळे उत्पादन कमी होत आहे. यापुढेही खाद्यतेलाचे दर वाढतील असा अंदाज आहे.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने दोन दिवस बाजार समिती बंद आहे. सोमवारी भाजीपाला घेऊन जावा लागणार आहे. नाहीतर नासच होईल. कांद्याला दर कमी मिळत आहे.
- रामा काळे, शेतकरी