सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याने मंडईतील पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार सुरू आहे. तर सातारा बाजार समितीत आवक चांगली होत असली तरी दर मात्र वाढलेले नाहीत. त्याचबरोबर बहुतांश खाद्यतेलाचे दर स्थिर आहेत.
सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असला तरी बाजार समिती सुरू आहे. त्यामुळे शेतमालाची आवक अजूनही चांगलीच होत आहे.
सातारा बाजार समितीत रविवारी १ हजार २२ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा २८६, बटाटा ३४२, लसूण २० आणि आल्याची १२ क्विंटल आवक राहिली. तसेच डाळिंब, आंबा, खरबूज, कलिंगड, द्राक्षे यांची काही प्रमाणात आवक झाली. मात्र, दरात तेजी नसल्याचे दिसून आले.
सोयाबीन तेलाला मागणी
खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. पण, मागील आठवड्यात दर स्थिर राहिला. त्यातच सूर्यफूल तेलाचा दर तेजीत असल्याने ग्राहक सोयाबीन तेलाकडे वळला आहे. त्यामुळे सोयाबीन तेल डब्यामागे ५० रुपये वाढ होऊन २३०० पर्यंत पोहोचला आहे. तर सूर्यफूल तेल डबा २५०० ते २५५०, शेंगतेलचा २५५० पर्यंत मिळत आहे.
सफरचंद आवक नाही
सातारा बाजार समितीत सफरचंदची आवक होत नाही. मात्र, कलिंगड, टरबूजची होत आहे. आता आंब्याचीही आवक वाढू लागली आहे. मात्र, ग्राहक कमी आहे.
वाटाण्याला दर
सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला ८० ते १०० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ३० ते ६०, फ्लॉवर २०० ते २५०, दोडका २५० ते ३००, मिरचीला १०० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १२००, लसूण ५ हजार, तर वाटण्याला ८ हजारांपर्यंत दर मिळाला.
कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यातच जवळच्या ठिकाणी भाजी खरेदी केली. मात्र, किरकोळ विक्रेते दर वाढवत आहेत.
- शामराव पाटील, ग्राहक
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. मात्र, मागील आठवड्यात भाव स्थिर राहिला. असे असले तरी खाद्यतेलाचे भाव कमी होतील, अशी स्थिती सध्यातरी नाही.
- संजय भोईटे, दुकानदार
लॉकडाऊनमुळे भाज्यांचे दर कमी होण्याची भीती आहे. कारण, व्यापारी कमी दरानेच मागत आहेत. कडक लॉकडाऊन झाला तर भाजीपाला काढून टाकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- तानाजी सावंत, शेतकरी
.......................................................................................................................