सातारा : मागील आठ महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर वाढला होता. पण, तीन आठवड्यांपासून त्यात उतार आला आहे. गेल्या दोन आठवड्यांत तर दर जैसे थे राहिले आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो कवडीमोलच आहे. वांग्याचा भाव कमी झाला. कांद्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळत आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ४१० क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. रविवारी कांद्याची आवक झाली नसली तरी क्विंटलला ५००पासून २ हजारांपर्यंत दर मिळत आहे. तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ३० ते ५० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला १,२००पर्यंत तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाला. त्याचबरोबर वाटाण्याला ९ ते १० हजारांपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीत भुईमूग शेंगाचीही आवक होत आहे.
खाद्यतेल बाजारभाव...
मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २,३०० ते २,४०० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर पामतेलचा डबा १,८५०, शेंगदाणा तेल डबा २,२५० ते २,४०० आणि सोयाबीनचा डबा २,१०० ते २,२५० रुपयांपर्यंत मिळत आहे. सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १५० रुपये, सूर्यफूलचा पाऊच १७० रुपयांना मिळत आहे.
डाळिंबाची आवक...
बाजार समितीत आंब्याची आवक कमी झालेली आहे. सध्या डाळिंब आणि पपईची आवक चांगली होत आहे. मात्र, दर कमी मिळत आहे.
बटाटा दर...
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १,४०० ते १,६०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला २५० ते ३५०, ढबू २५० ते ३००, शेवगा शेंग २५० ते ३००, गवारला १५० ते २०० रुपये दर १० किलोला मिळाला.
प्रतिक्रिया
मागील एक महिन्यापासून खाद्यतेल दरात उतार आला आहे. डब्याबरोबरच पाऊचचेही दर उतरले आहेत. यामुळे अनेक महिन्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
- संभाजी आगुंडे,
विक्री प्रतिनिधी
तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे कोणतीही भाजी ही ४० रुपयांवर किलो मिळत आहे. सध्या वाटाणा तेवढा १२० रुपये किलोच्या पुढे मिळत आहे. कांदाही स्थिर आहे.
- पांडुरंग काळे,
ग्राहक
मागील दोन महिन्यांपासून कांद्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर वाटाण्यालाही चांगला भाव आहे. पण, टोमॅटो अन् कोबीचा भाव पडलेलाच आहे. त्यामुळे या दोन भाजीपाल्यातून तोटा होत आहे. खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. - राजाराम पाटील, शेतकरी
................................................................................................................................................................................................................