सातारा : जिल्ह्यात कोबी अन् टोमॅटोचा दर कमी असला तरी इतर भाज्यांचा भाव मात्र वाढलेला आहे. सध्या वांग्याचा दर थोडा कमी झाला असून वाटाणा १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याचबरोबर मागील आठवड्यातही खाद्यतेलाचे दर स्थिर राहिल्याचे दिसून आले.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ३६८ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. कांद्याची अधिक आवक झाली नसली तरी क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळाला, तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ४० ते ६० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २५० ते ३०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला १७०० पर्यंत तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वाटाण्याला ९ ते १० हजारांपर्यंत भाव मिळाला. वाटाण्याला क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ झालेली आहे. बाजार समितीत भुईमूग शेंगाचीही आवक होत आहे.
खाद्यतेल भाव...
मागील महिन्यापासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २३०० ते २४०० पर्यंत मिळत आहे. तर पामतेलचा १८५०, शेंगदाणा तेल डबा २२५० ते २४०० आणि सोयाबीनचा २१०० ते २२५० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १५०, सूर्यफूलचा १७० रुपयांना मिळत आहे.
डाळिंबाची आवक...
बाजार समितीत आंब्याची आवक पूर्णपणे बंद झाली. तर संत्री, डाळिंब आणि पपई आली होती. डाळिंबाची २६ व पपईची फक्त ४ क्विंटलची आवक झाली.
बटाटा दर स्थिर...
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १४०० ते १६०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला ३०० ते ३५०, ढबू ३०० ते ३५०, शेवगा शेंग ३०० ते ४००, गवारला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाल्याचे दिसून आले.
प्रतिक्रिया...
मागील एक महिन्यापासून खाद्यतेल दरात उतार आला आहे. सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन तेल डबा सरासरी ३०० ते ३५० रुपयांनी कमी झाला आहे. पाऊचचेही दर उतरले आहेत.
- संभाजी आगुंडे,
विक्री प्रतिनिधी
दोन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे कोणतीही भाजी ही ४० रुपयांवर किलो मिळत आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने अधिक दराने भाजीपाला घ्यावा लागतो.
- शांताराम जाधव,
विक्री प्रतिनिधी
सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला १० हजारापर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कोबी व टोमॅटोला अजूनही एकदमच कमी भाव मिळत आहे. यामुळे खर्चही निघत नाही.
- तातोबा काळे, शेतकरी