सातारा : मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर असून कांद्याचा भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी उतरला आहे. तर इतर भाज्या स्वस्त असतानाच वाटाण्याला क्विंटलला ६ हजारापर्यंत दर मिळत आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी बाजार समितीत ४३१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची १३५ क्विंटलची आवक राहिली. कांद्याला क्विंटलला १०० पासून १९००पर्यंत दर मिळाला. तर वांग्याचा दर कमी झाल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ६० ते ७० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला १५० ते २०० रुपये भाव आला. आल्याला क्विंटलला २ हजारांपर्यंत तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून आले आणि लसणाचा दर स्थिर असल्याचे दिसून आले. तर वाटाण्याचा भाव वाढत आहे. रविवारी क्विंटलला ५ ते ६ हजारापर्यंत दर मिळाला.
खाद्यतेल बाजारभाव...
सध्या तरी खाद्यतेलाचा दर स्थिर आहे. पण, काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे दर उतरण्याची शक्यता आहे. साताऱ्यात सूर्यफूल व शेंगदाणा तेल डबा २४०० ते २४५० रुपयांना मिळत आहे. तर सोयाबीनचा २४०० व पामतेलचा २१०० रुपयांना मिळत आहे. पाऊचचा दरही स्थिर आहे.
डाळिंबाची आवक...
बाजार समितीत सध्या डाळिंब, सफरचंद, सीताफळ आणि संत्र्याची आवक होत आहे. रविवारी सफरचंदाची ४० तर डाळिंबाची १० क्विंटलची आवक झाली.
शेवगा दरात सुधारणा...
बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर कमी झालेत. कोबी आणि बटाट्याला भाव कमी आहे. कोबीला १० किलोला ६० ते ८०, बटाट्याला १२० ते १४० रुपये भाव आला. भेंडीला १०० ते १५०, शेवगा शेंग ४०० ते ५००, गवारला १०० ते १२० रुपये दर आला. गवारचा दर कमी तर शेवग्याचा वाढला आहे.
प्रतिक्रिया...
खाद्यतेलाचा दर स्थिर आहे. पण, केंद्र शासनाने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खाद्यतेलाचा दर थोडा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
मागील काही काही दिवसांत भाज्यांचा भाव कमी-जास्त होत आहे. तरीही कोणतीही भाजी ही ४० रुपयांच्या खाली नाही. काही भाज्यांना तर किलोला ८० रुपये मोजावे लागतात. मेथी, शेपू पेंडी १० रुपयांपुढे मिळत आहे.
- कविता काळे, ग्राहक
बाजार समितीत शेतमाल नेल्यास दर कमी मिळतो. त्यातच आता कांद्याचा दरही कमी झाल्याने खर्च निघणेही अवघड झालेले आहे. वांगी, कोबी आणि फ्लॉवरला दर कमीच मिळतोय. सध्या वाटाण्याला तेवढा चांगला दर मिळत आहे.
- रामराव पवार, शेतकरी
..........................................................................................................................................................................................