सातारा : मान्सूनचा पाऊस उशिरा पडल्यानंतर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम झाला. त्यामुळे आॅक्टोबर मध्यावर आलातरी शिवरात खरीप हंगामातील पिके उभी आहेत. परिणामी काढणीस वेळ लागणार असल्याने रब्बी हंगामाचा पेराही लांबणार आहे. या कारणाने खरीपात पिकाचे उत्पादन कमी झाले. तसेच रब्बी हंगामावरही परिणाम होणार असल्याने बळीराजाला अडचणींचाच सामना करावा लागणार आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. खरीपातील सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ९० हजार हेक्टरपर्यंत असते. तर रब्बीतील २ लाख १३ हजार हेक्टर राहते. या दोन्ही पीक हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त असते. यासाठी पावसाची गरज लागते. त्यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाल्यानंतर खरीप पेरणीला वेग येतो. पण, यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला. त्यानंतर वारंवार पावसाचा खंड पडला. त्यामुळे पेरणीवर परिणाम झाला.परिणामी यावर्षी खरीपाची ९४ टक्के क्षेत्रावरच पेर झाली. यामध्ये माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात पेरणीवर अधिक परिणाम झाला. आता पीक काढणीस सुरुवात झाली असून यासाठी किमान महिना लागणार आहे. त्यामुळे रब्बीतील ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी होण्याची शक्यता आहे. तर गहू, हरभरा क्षेत्रात वाढ होऊ शकते. पण, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकांना पाणी कमी पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे कोणते पीक घ्यावे असा प्रश्न पडलेला.
जिल्ह्यात यावर्षी रब्बीचे सर्वसाधारणपणे २ लाख १३ हजार २०९ हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. यामधील ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर अंदाजे राहणार आहे. तर यानंतर गहू क्षेत्र सर्वसाधारणपणे ३७ हजार ३७४ हेक्टर, हरभरा २७ हजार ७५३ हेक्टर, मका क्षेत्र १० हजार २०९ हेक्टर, तर कडधान्याचे १ हजार ७५३ हेक्टर आहे. सध्या जिल्ह्यातील रब्बी ज्वारी पेरणीला सुरूवात झाली असलीतरी प्रमाण कमी आहे. आतापर्यंत तीन टक्क्यांपर्यंत ज्वारीची पेर झाली आहे. तर मकेची ९६९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आॅक्टोबर मध्यावर आलातरी रब्बीतील पेरणीला अजून वेग आलेला नाही. त्यामुळे पेरणीचे क्षेत्र कमी राहिले आहे.
खरीपातील मोकळ्या रानात पेरणी..पावसाअभावी खरीप हंगामात अनेक हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली नव्हती. त्यामुळे सध्या रब्बीतील पेरणी सुरू असलीतरी खरीपात नापेर क्षेत्रावर सुरू आहे. कारण, अजुनही खरीपातील पिके रानात आहेत. बाजरी, सोयाबीन काढणी सुरू आहे. या पिकांचे उत्पादन घरात येण्यास किमान महिना लागणार आहे. त्यामुळे दिवाळीवेळीच रब्बी हंगामाची पेरणी वेग घेईल, असा अंदाज आहे.
पाणी कमी पडणार हीच मोठी समस्या..रब्बी हंगामाचे सर्वाधिक क्षेत्र हे दुष्काळी तालुक्यातच अधिक आहे. माणमध्ये सर्वसाधारणपणे ४६ हजार ४१८ हेक्टर आहे. तर फलटण तालुक्यात ३० हजार ८९०, खटावमध्ये २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६६ हेक्टर राहते. पण, याच तालुक्यात यंदा पाऊस कमी झालेला आहे. साधारणपणे ४० ते ५० टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे रब्बी हंगामात उशिरा पेरणी केल्यास उन्हाळ्यात पिकांना पाणी कमी पडणार आहे. यामुळे पेरणी करण्यास धजावणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.