कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. एकीकडे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करताना दुसरीकडे मात्र प्रशासनाची दिशाभूल करण्याचे प्रकार सुरू आहेत. कऱ्हाड शहरात मंगळवारी कडक निर्बंधाच्या पहिल्या दिवशीच पोलिसांनी अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला. कोल्हापूर नाका, भेदा चौक, विजय दिवस चौक, कृष्णा कॅनाॅल येथे वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये बहुतांश नागरिकांनी हॉस्पिटलचे कारण सांगून तेथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले, तर रुग्णालयाच्या एका ओळखपत्रावर दोघेजण बाहेर फिरत असल्याचेही पोलिसांना आढळले. संबंधितांवर पोलिसांनी कारवाई केली. काही जण रुग्णालयाची जुनी कागदपत्रे दाखवत होते, तर एका नागरिकाने चक्क गाडीवरून फिरताना मास्कची गरजच काय, असे म्हणून पोलिसांशीच वाद घातला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला नियम समजावून सांगितले. तरीही तो ऐकण्यास तयार नव्हता. त्यावेळी पोलिसांशी त्याला प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलण्यास सांगितले असता संबंधिताची बोलती बंद झाली. अखेर पोलिसांनी त्याला पाचशे रुपयांचा दंड केला.
शहरातील मुख्य चौकात दिवसभर पोलीस थांबून होते. विनाकारण फिरताना कोणी आढळल्यास संबंधितावर तातडीने कारवाई करण्यात येत होती. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो : २५केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड शहरात मंगळवारी कडक लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. पोलिसांनी मुख्य मार्गावर नाकाबंदी करून वाहनधारकांची चौकशी केली.