सातारा : वनांना वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळरेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
सातारा येथील वनविभाग कार्यालयात वनविभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला उपवनसंरक्षक डॉ. भारतससिंह हाडा, सहायक वनसंरक्षक व्ही. जे. गोसावी, सहायक वनसंरक्षक एस. बी. चव्हाण, सहायक वनसंरक्षक के. एस. कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. ढोंबाळे, आदी उपस्थित होते.
उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जंगलामध्ये नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे निर्मिती करून वन्य जिवांना पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीत येण्यापासून रोखणे शक्य होईल, असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत जिल्हा नियोजन समितीअंतर्गत वन विभागास प्राप्त होणारा निधी व सेवासुविधांसाठी होणारा संभाव्य खर्च आणि वनविभागाच्या इतर विषयांचा सविस्तर आढावा बैठकीत घेतला.