कऱ्हाड/पंढरपूर : राज्यात नेतृत्वबदल होणार नाही, असे ठामपणे सांगत नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर पसरविल्या जात आहेत, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगावला.आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेसाठी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अॅन्थनी समितीने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात नेतृत्वबदल होईल, अशा चर्चांना ऊत आला आहे. पक्ष नेतृत्वाने कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असून, ते तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आज दिवसभर होती; मात्र स्वत: विखे यांनीच याचा इन्कार केला. ते आज मुंबईतच होते. उद्योगमंत्री नारायण राणे यांचेही नाव चर्चेत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४४ जागांची मागणी करत प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, हे त्यांचं वैयक्तिक मत असून त्यावर मी भाष्य करणार नाही; पण जागावाटपाचा फॉर्म्युला जुनाच असून त्यात फारसा बदल होणार नाही. जागांच्या अदलाबदलीबाबत दोन्ही पक्षांच्या दिल्लीतील नेत्यांची बैठक होऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल. आम्ही पाच निवडणुका एकत्रित लढलोय. तुम्ही चिंता करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नेतृत्वबदलाच्या बातम्या हेतुपुरस्सर : पृथ्वीराज चव्हाण
By admin | Published: July 09, 2014 12:10 AM