आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोना ही महाभयानक महामारी आहे. अशी महामारी १०० वर्षांपूर्वी आली होती. ज्याला आपण स्पॅनिश फ्लू नावाने ओळखतो. त्यावेळी हजारो माणसे मृत्युमुखी पडली होती. परंतु त्याचीच दुसरी लाट आली, त्यावेळी त्याचा परिणाम पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. याचप्रमाणे १०० वर्षांनंतर कोरोना ही महामारी आली आहे. याच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली आहे. या लाटेसाठी सज्ज राहून मुकाबला केला तरच टिकाव लागू शकेल.
परंतु आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, भारताने कशाप्रकारे कोरोनावर मात केली याचा बडेजाव त्यांनी संपूर्ण जगासमोर मारला. यामुळे आपल्या देशातील यंत्रणा ढिली पडली व पुढे उद्भवलेल्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात आपण कमी पडलो आहोत. परंतु आता प्रशासनाने व राज्य सरकारने कंबर कसली आहे, कोरोनाला हद्दपार करण्याची वेळ आली आहे आणि यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असून, सर्वांचे लसीकरण होणे तितकेच गरजेचे आहे.
याचसोबत लसींचा तुटवडा जरी होत असला तरी लसीकरणाचे योग्य नियोजनही केले जाणार आहे. अशा प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करून कोरोनाला हद्दपार करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.