फलटण : फलटण शहरवासीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगर परिषद प्राथमिक शाळा नंबर १ (बाहुली शाळा), शंकर मार्केट येथे उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये नागरी आरोग्य सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या इमारतीचा विस्तार करण्यात येत असून, तेथे अधिक आरोग्य सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्याधिकारी तथा या नागरी आरोग्य सुविधा केंद्र रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष प्रसाद काटकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, या रुग्णालयासाठी एमबीबीएस डॉक्टर्सची दोन पदे मंजूर असून, त्यापैकी एक पद रिक्त आहे. प्रयोगशाळा १, जीएनएम २, एएनएम ६, आशासेविका २१, अंगणवाडी सेविका ११, मदतनीस ११ पदे मंजूर असून, त्यापैकी १ डॉक्टर व ३ आशा सेविका पदे रिक्त असल्याचे सांगून विविध वैद्यकीय सुविधा येथे उपलब्ध आहेत, आणखी आवश्यक साधने सुविधा उपलब्ध करुन देऊन फलटणवासीयांना दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे.
शहराची लोकवस्ती सुमारे ६० हजार आणि शेजारच्या जाधववाडी, कोळकी, फरांदवाडी, ठाकुरकी येथून जवळपास तेवढेच लोक शहरात येत असतात. म्हणजे सुमारे दीड पावणे दोन लाख लोकवस्तीच्या या शहरातील सदरच्या रुग्णालयात आयसीयूसह आंतररुग्ण विभाग सुरु करण्याची मागणी होत असल्याने त्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
(फोटो : नगरपालिका रुग्णालयाची पाहणी करून संबंधितांना सूचना देताना मुख्याधिकारी प्रसाद काटकर.)