वडूज : वडूज शहर स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून अहरोत्र झटणाऱ्या प्रयाय सामाजिक संस्थेने आता येरळा नदी स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावे, यासाठी संस्थेकडून ठिकठिकाणी जनजागृती फलक लावले असून, या उपक्रमाचे नागरिकांमधूनही कौतुक होत आहे.
वडूजसारख्या मोठ्या शहरात प्रयास सामाजिक संस्थेने स्वच्छता मोहिमेचे काम हाती घेतले. प्रारंभी पाच ते सहा सदस्यसंख्या असलेल्या या संस्थेशी आत जवळपास ५० नागरिक जोडले गेले आहेत. यामध्ये व्यापारी, वकील, डॉक्टर व महाविद्यालयीन युवकांचा समावेश आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयास संस्थेने नदीकाठावर अडीचशे वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, पारिजातक, कन्हेर, कदंब, भोकर, बकूळ, अर्जुन, चाफा, बांबू आदी रोपांचा समावेश आहे. वृक्षसंवर्धन झाल्याने नदीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
सध्या येरळा पात्रातील अस्वच्छता दूर करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. यासाठी नदीपात्र स्वच्छ करण्याबरोबरच त्यामध्ये नागरिकांनी निर्माल्य टाकू नये यासाठी प्रयास सामाजिक संस्थेने जनजागृतीपर उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेने येरळा पात्रात पडणारा कचरा रोखण्यासाठी पुलाच्या दुतर्फा जनजागृती फलक लावून वडूजकरांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय निर्माल्य संकलनासाठी कलशाची व्यवस्थाही केला आहे. संस्थेच्या या उपक्रमाने पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून कौतुक होत आहे.
फोटो : १२ वडूज
वडूज येथील प्रयास सामाजिक संस्थेने येरळा नदी स्वच्छतेसाठी ठिकठिकाणी असे जनजागृती फलक लावले आहेत. (छाया : शेखर जाधव)