मसूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मसूर येथे दि. २ ते ९ मे या कालावधीत एक आठवड्याचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा म्हणजे दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण व्यवहार बंद राहतील. हा निर्णय कोरोना ग्राम समिती, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्वयंस्फूर्तीने घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंकज दीक्षित होते. सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव उपस्थित होते.
मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ‘कोराेनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लहान मुलांपासून सर्वांनाच याची लागण होत आहे. एकमेकांच्या स्पर्शाने, संगतीने संसर्ग वाढत आहे. गतवर्षी कोरोना आला परंतु आपण योग्य त्या उपाययोजना केल्या होत्या. सगळीकडे बंद होता; परंतु याला अपवाद मसूर राहिले होते. परंतु यंदा वाढत्या रुग्णसंख्येमुळे जनता कर्फ्यू हे धाडसी पाउल उचलावे लागत आहे.
सरपंच पंकज दीक्षित म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणाही चांगल्या प्रकारे काम करत आहे; परंतु प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण आल्याने त्यांचाही नाइलाज होत आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून गावातील इतर सर्व व्यवसाय म्हणजेच किराणा व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थ विक्री व्यवसाय, भाजीपाला, बेकरी, चिकण-मटण व्यवसाय, शेतीसंबंधी सर्व दुकाने, हार्डवेअर इत्यादी व्यवसाय बंद राहतील, तर अत्यावश्यक सेवा मेडिकल व दवाखाने सुरू राहतील. व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव म्हणाले, ‘गावातील सर्वांनी एकत्र येऊन स्वयंप्रेरणेने गावच्या हितासाठी घेतलेला जनता कर्फ्यूचा निर्णय योग्य असून, सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी. कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित राहिली पाहिजे यासाठीच हा निर्णय योग्यच आहे.
ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी आभार मानले.
बैठकीस उपसरपंच विजयसिंह जगदाळे. ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, प्रमोद चव्हाण, सुनील जगदाळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे मसूर शहराध्यक्ष सिकंदर शेख उपस्थित होते.
कोट
दुकानदारांनी या आठ दिवसांच्या जनता कर्फ्यूमध्ये पाठीमागील दाराने माल विक्री करू नये, अशी विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल.
- प्रवीण जाधव,
पोलीस उपनिरीक्षक, मसूर
फोटो जगन्नाथ कुंभार यांनी मेल केला आहे.
मसूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, सरपंच पंकज दीक्षित, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव आदी.