वेळे (सातारा) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट संपल्यानंतर वेळे हद्दीत तीव्र उतारावर प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस पलटी झाली. यामध्ये चालकासह आठजण जखमी झाले. जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, खासगी प्रवासी बस (जीए ०७ एफ ३९२६) ही पुण्याहून गोव्याला निघाली होती. ती सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर पुढे आली. तीव्र उतारामुळे बस चालकाने ब्रेक दाबला; परंतु ब्रेक अडकून बसला. त्यामुळे बस रस्त्याकडेला असलेल्या बारा फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली. तिथे असणाºया झाडांमुळे बस तिथेच अडकून राहिली म्हणून मोठा अनर्थ टळला.
अपघात झाला तेव्हा बसमधून पंचवीस जण प्रवास करत होते. त्यातील आठजण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वेळे येथील ग्रामस्थ व मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्यास सुरुवात करून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी प्रवाशांना कवठेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये आयुष कोळी (वय ६), हर्ष वाळके (५), मानसी वाळके (७), विनय परोलेकर (२४) यांचा समावेश आहे.