लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गेल्या आठ महिन्यांत तब्बल ८३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, २३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले असून, टॅमी फ्लूच्या पाच हजार गोळ्यांचा साठा रुग्णालय प्रशासनाने शिलकीमध्ये ठेवला आहे.
जानेवारी महिन्यामध्ये जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर स्वाईन फ्लू संशयितांची संख्या वाढतच गेली. रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी होऊ लागली. त्यामध्ये जवळपास ८३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचार सुरू असताना यातील २३ जणांना आपला जीव गमवावा लागला. दर वर्षी ऐन गणेशोत्सवामध्येच स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने टॅमी फ्लूच्या पाच हजार गोळ्या शिलकीमध्ये ठेवल्याआहेत. प्रत्येक रुग्णाची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या घसा आणि स्त्रावाचे नमुने घेतले जातात. त्यानंतर पुणे येथील प्रयोग शाळेत हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येतात. दोन दिवसांमध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्णाला टॅमी फ्लूच्या गोळ्या दिला जातात.जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सध्या चार वैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेखीखाली स्वाईन फ्लू रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नागरिकांनी ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात येऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी केले आहे.गंभीर असेल तर नमुने घेणारथंडी, तापाची लक्षणे असल्यास अनेकजण भीतीपोटी स्वाईन फ्लूची तपासणी करत आहेत. मात्र, रुग्णालय प्रशासनाने रुग्ण गंभीर असल्याशिवाय आम्ही स्वाईन फ्लूची तपासणी करणार नाही, असा अलिखीत फतवा काढल्याने रुग्णांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरसकट सर्व रुग्णांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.