लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरांमध्ये सर्वाधिक दुचाकी चोरीला जाण्याची आठ ठिकाणे समोर आली असून, या ठिकाणी दुचाकी पार्क करताना प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे, अन्यथा आपली दुचाकी चोरीस गेली म्हणून समजाच. या परिसरामध्ये चोरटे सावज हेरून बसत असून, महिन्याभरात एकाच ठिकाणाहून तब्बल आठ दुचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सातारा शहरांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण अचानक वाढले. शहरातून दिवसाला दोन दुचाकी चोरीला जाऊ लागल्या. एकीकडे दुचाकी चोरणारी टोळी पोलीस अटक करत असतानाच दुसरीकडे मात्र दुचाकी चोरीच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे दुचाकी चोरणाऱ्या बऱ्याच टोळ्या सक्रिय असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. सातारा शहरातील सिव्हिल हाॅस्पिटल, बसस्थानक, विसावा नाका, शहरातील खासगी हाॅस्पिटले, देवी चाैक परिसर, समर्थ मंदिर, शाहूपुरी, जिल्हा परिषद या आठ ठिकाणांहून सातत्याने दुचाकी चोरीस जात आहेत.
चौकट: आतापर्यंत ८३ दुचाकी सापडल्या..
गेल्या तीन वर्षांत दीडशेहून अधिक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. मात्र, सापडल्या केवळ ४६. पर जिल्ह्यातून साताऱ्यात येऊन चोरी केल्यानंतर पोलिसांना दुचाकी हस्तगत करताना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे रिकव्हरीचे प्रमाण कमी आहे.
चौकट : चोरावर बक्षीस ठेवण्याची पद्धतच नाही...
इतर राज्यांमध्ये जसे चोरट्यांवर पोलीस बक्षीस जाहीर करतात तसं सातारा जिल्हा पोलीस दल आरोपींना पकडण्यासाठी नागरिकांना बक्षीस जाहीर करीत नाहीत. म्हणे ही पद्धतच नाही. पोलिसांच्या तपासाच्या कौशल्यावरच आरोपी सापडले पाहिजेत यावर पोलीस यंत्रणेचा विश्वास आहे.