दहिवडी : कोविडच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद दिला असून, ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व नगराध्यक्ष धनाजी जाधव यांच्या उपस्थितीत नगरपंचायत हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांची बैठक झाली. या बैठकीस माण पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव, माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, सिद्धार्थ गुंडगे, नगरसेवक प्रशांत शिंदे, लालासाहेब ढवाण आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये कोविडचा असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, तसेच संपूर्ण शहरात एकच सार्वजनिक गणेशोत्सव करावा, असे आवाहन करण्यात आले.
या आवाहनाला सर्वच मान्यवर, तसेच मंडळांनी प्रतिसाद दिला. सर्वानुमते आझाद गणेश मंदिरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात सर्व मंडळांनी सहभागी होऊन सर्वांनी सहकार्य करायचे, तसेच रोज एका मंडळाला आरतीचा मान देण्याचे ठरविण्यात आले. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन नगराध्यक्ष जाधव यांनी केले.
फोटो : ०९ दहिवडी
दहिवडीतील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सहायक पोलीस निरीक्षक संतोष आसगावाकर, नगराध्यक्ष धनाजी जाधव, माजी सभापती अतुल जाधव यांनी मार्गदर्शन केले.