सातारा : ‘अनेकांची इच्छा मुख्यमंत्री होण्याची असते. तसेच अजित पवारांनी व्यक्त केली. भाजपबरोबर ते आलेतरी त्यांना लवकर मुख्यमंत्रीपद मिळेल असे वाटत नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील,’ असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच टांगती तलवार शिंदे यांच्यावर नाहीतर उध्दव ठाकरे यांच्यावर असल्याचा दावाही त्यांनी केला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.
मंत्री आठवले म्हणाले, ‘‘रिपाइं’चे अधिवेशन २८ मे रोजी शिर्डी येथे होणार आहे. देशातून ५० हजार कार्यकर्ते येतील असे नियोजन आहे. यामध्ये नागालॅंडमधील आमच्या पक्षाचे दोन आमदारही सहभागी होतील. देशात पक्षवाढीवर भर देण्यात येणार आहे. अधिवेशनात भूमिहीन कुटुंबांना पाच एकर जमीन द्यावी अशी आमची मागणी राहणार आहे. कारण, शहराकडे येणारे लोंढे थांबतील. गावातील माणूस गावातच राहील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील गावी आले होते. ते सुट्टीवर आले नव्हते. तर शेती पाहणे, कुटुंबाला भेटण्यासाठी आलेले असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे. तसाच सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल मेरीटवर लागेल. कारण, ७५ टक्के आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे आहेत. उध्दव ठाकरे यांनी आमदारांची कामेच केली नाहीत. कोरोना काळात त्यांना भेटलेही नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होऊन सत्ता मिळेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे राहणार असतील तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लागल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर मंत्री आठवले यांनी अजित पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आघाडी असताना राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते. तेव्हा त्यांना संधी होती. पण, मुख्यमंत्री होता आले नाही. शरद पवार यांच्या तालमीत अजित पवार तयार झालेले आहेत. ते आमच्या महायुतीत आलेतर आनंद आहे. पण, मुख्यमंत्री हे शिंदेच राहतील. कारण, अजित पवार यांना लवकर संधी मिळणार नाही, असे वाटते.
एकनाथ शिंदेंचे महाबंड; राऊतांच्या भूलथापा...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती. पण, त्याप्रमाणात अधिक मते मिळत नव्हती. शिवसेनेत आतापर्यंत अनेकवेळा बंड झाले. पण, ते तेवढ्यापुरते मर्यादित होते. एकनाथ शिंदे यांचे हे महाबंड आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांच्या भूलथापांना बळी पडून उध्दव ठाकरे हे आघाडीत गेले, असा दावाही त्यांनी केला.
राज ठाकरेंनी स्वतंत्र राहणे फायद्याचे...मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यास विरोध का ? या प्रश्नावर आठवले यांनी स्वतंत्र राहिल्यावर भाषण करण्याची संधी मिळते. ते त्यांच्या फायद्याचेच आहे. त्यांची आवश्यकता आम्हाला नाही. माझा पक्ष युतीत असताना ते नकोत, असा सल्लाही त्यांनी दिला.