बामणोली : सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात जो काही भूकंप घडवून आणला आणि त्यांनतर त्यांच्या बंडामुळे शिवसेनेत राज्यभर उभी फूट पडली आहे. महाराष्ट्रातून काही ठिकाणाहून शिवसैनिकांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर येत असून या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या मूळ गावीसुद्धा सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आता त्यांच्या मूळ गावीही उमटू लागले आहेत.साताऱ्यातील दरे तर्फ तांब, ता. महाबळेश्वर येथील शिंदे यांच्या घरावर सुरक्षेच्या कारणास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रथमच एवढा कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहून ग्रामस्थ अवाक झाले आहेत. गावातील ग्रामस्थ आता साहेबांच्या पुढील भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत. शिंदे साहेबांच्या खळबळजनक निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनाही आता चांगलाच वेग आला आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी घेतलेली आक्रमक भूमिका तसेच त्यांच्या तीव्र भावना पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सध्या सावधानतेचा पवित्रा घेतला आहे.
एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त, ग्रामस्थ अवाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 7:51 PM