नितीन काळेल
सातारा : सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय. जिल्ह्याने राज्याला एक-दोन नाही तर आतापर्यंत चार मुख्यमंत्री दिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीयशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. शिंदे हे ठाण्यातून निवडून येत असले तरी ते महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब गावचे आहेत.
हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्राची निर्मिती १ जून १९६० मध्ये झाली. या दिवसापासून ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी राहिले. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्याचवेळी चीनने भारतावर आक्रमण केल्याने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चव्हाण यांना दिल्लीत बोलवून संरक्षणमंत्री केले. त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे वर्णन करण्यात आले.
बाबासाहेब भोसले
त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार झाले; पण यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय राजकारणात गेले तरी त्यांची महाराष्ट्रावर पकड होती. जानेवारी १९८२ मध्ये ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यावेळी काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक होते; पण बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांना पक्षाने संधी दिली. ते त्यावेळी मुंबईतील नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते; पण त्यांना अल्पकाळ मुख्यमंत्रिपदी राहता आले. २१ जानेवाारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा त्यांचा कार्यकाळ राहिला. भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कलेढोण (ता. खटाव) गावचे. भोसले हे जिल्ह्यातील दुसरे मुख्यमंत्री ठरले.
पृथ्वीराज चव्हाण
१९९५ नंतर राज्यातील सत्ताकारण बदलले. शिवसेना-भाजप युती, त्यानंतर आघाडी सरकार आले. २००९ मध्ये आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यावेळी काही कारणाने अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे कऱ्हाडच्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रिपद दिले. चव्हाण हे विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यही नव्हते. नंतर ते विधान परिषदेत निवडून गेले. चव्हाण यांनी तत्कालीन कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केले होते. चव्हाण हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले. १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ असा त्यांचा कार्यकाल राहिला.
आताचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येत आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या गावचे आहेत. ते महाराष्ट्राचे २५ वे मुख्यमंत्री होणार आहेत. शिंदे हे ठाण्यात असतात; पण गावाशी त्यांनी आजही नाळ जपली आहे. वारंवार ते गावी येतात. गावातील विविध कार्यक्रमांत सहभागी होतात, तसेच शेतीकामातही उतरतात. त्यांचे गावावर असणारे प्रेम हे कायम दिसून आले आहे.
तिघेही काँग्रेसचे; पूर्ण कार्यकाळ नाही...
सातारा जिल्ह्याने यापूर्वी तीन मुख्यमंत्री राज्याला दिले होते. तिघेही काँग्रेस पक्षाचे होते; पण यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण या तिघांनाही पूर्ण पाच वर्षे मिळाली नाहीत. आता तर एकनाथ शिंदे हे किती वर्षे मुख्यमंत्री राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.