दत्ता यादव ।सातारा : कायदे, नियम याची माहिती नसल्यामुळे अनेक वयोवृद्ध आपल्या हक्कापासून वंचित राहतात. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला ते वाचा फोडू शकत नाहीत. अशा वयोवृद्धांना कायदा जाणून घेण्याचं अखेर व्यासपीठ मिळालंय. साता-यात रविवार, दि. १९ रोजी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
बदलत्या जीवनशैलीत वृद्ध आई-वडील तरुण पिढीला आता नकोसे होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक वृद्धांना नाईलाजास्तव आश्रमाचा रस्ता धरावा लागतोय. त्यातच वयोवृद्धांना असलेले कायद्याचे अपुरे ज्ञान. आपले हक्क काय आहेत, हे माहीत नसल्यामुळे वृद्धांची फरपट आणि हेळसांड होत असते. हे प्रकार तर थांबायलाच पाहिजेत; पण याबरोबरच शासनाच्या कल्याणकारी योजनाही ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहचायला हव्यात, यासाठी आता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सरसावले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक सेवांचे महाशिबिर होत आहे.
या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणा-या विविध कल्याणकारी कायदे, योजना याबाबत माहिती दिली जाणार आहे. या योजनांची अंमलबजावणी विविध खात्यांमार्फत सक्षम पद्धतीने होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गरजू ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन आवश्यक त्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्काळ कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना मालमत्तेसाठी घरातून हाकलून दिले जाते. हा विषय अतिशय गंभीर असल्यामुळे या विषयावरही या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक कायदा, मृत्यूपत्र, मालमत्ता हस्तांतरण कायदा, हिंदू वारसा कायदा, मुस्लीम कायदा या विषयांचा समावेश आहे. या मेळाव्याला न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश प्रवीण कुंभोजकर हेही उपस्थित राहणार आहेत.
- ‘लोकमत’नं केली राज्यभरात जनजागृती
‘इभ्रतीपुढे उतारवयातील परवड फिकी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या राज्यभरातील सर्व आवृत्त्यांमध्ये दि. ४ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘लोकमत’ने वृद्धांची परवड समाजासमोर आणली. या पार्श्वभूमीवर हे महाशिबिर आयोजित होत असल्याने वयोवृद्धांना दिलासा मिळालाय.