शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी येथे राहत्या घरातील तुळईला नायलाॅनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेत वृध्दाने आत्महत्या केली. अरविंद श्रीपती वीर (वय ६८) असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. आत्महत्येमागील कारणाचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अरविंद वीर हे पुणे येथून मूळगाव सांगवी याठिकाणी मंगळवारी आले होते. बुधवारी घराचा दरवाजा अरविंद वीर हे उघडत नसल्याने मुलगा व नागरिकांनी घरावरील कौले काढून आत प्रवेश केला. तेव्हा घरामध्ये अरविंद वीर यांनी किचनमध्ये तुळईला दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अरविंद वीर यांना शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची फिर्याद योगेश वीर यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. अधिक तपास हवालदार मदन वरखडे, विनोद पवार हे करीत आहेत.