कऱ्हाड : तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका मंगळवारी पार पडल्या, तर बुधवारी प्रशासकीय कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. दक्षिणेत दोन ग्रामपंचायतींवर उंडाळकर, तर एका ग्रामपंचायतीवर भोसले गटाने विजय मिळविला, तर उत्तरेतील दोन ग्रामपंचायतींवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाने बाजी मारली.
कोळे येथे अतुल भोसले गटाकडून निवडून आलेले प्रदीप पाटील यांचे निधन झाल्याने रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागली होती. त्यामध्ये उंडाळकर गटाने बाजी मारली असून, श्रीकृष्ण पाटील हे १०२ मतांनी विजयी झाले. भोसले गटाच्या संपत दिनकर पाटील यांना २९७ मते मिळाली. या ग्रामपंचायतीत आता सर्वच्या सर्व जागा उंडाळकर गटाला मिळाल्या असून, एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे.
अकाईचीवाडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत उंडाळकर गटाला यश मिळाले आहे. बाळू विठू शेवाळे यांना २०२, तर मानसिंग तानाजी चिकाटे यांना १६७ मते मिळाली. त्यामुळे बाळू शेवाळे ३५ मतांनी विजयी झाले. तुळसण येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा पोटनिवडणुकीत पराभव झाला आहे. बाबासाहेब वीर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली. त्यामध्ये अतुल भोसले गटाचे सर्जेराव पांडुरंग वीर यांना २६६, तर पृथ्वीराज चव्हाण गटाच्या सुरेश यशवंतराव माने यांना १६६ मते मिळाली. त्यामुळे भोसले गटाचे सर्जेराव वीर शंभर मतांनी विजयी झाले.
दरम्यान, कऱ्हाड उत्तरेतील दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने विजय मिळविला. कालगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे समर्थक प्रदीप सर्जेराव चव्हाण हे १७० मतांनी विजयी झाले. भवानवाडी ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीतही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थक वैशाली विनोद यादव यांनी विजय मिळविला. त्यांना १०८ मते मिळाली, तर विरोधी उमेदवार दीपाली नंदकुमार माने यांना ७३, मंगल अजित काळे यांना ६९ मते मिळाली आहेत.
कडक पोलीस बंदोबस्त
कऱ्हाडातील प्रशासकीय इमारतीत बुधवारी मतमोजणी पार पडली. यावेळी इमारत परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. प्रशासकीय इमारतीपासून काही अंतरावर कार्यकर्ते जल्लोष करीत होते.