बॅटऱ्या दुरुस्तीतून रोजगार निर्मिती
इलेक्ट्रीक गाड्यांत सर्वात महत्त्वाचे काम बॅटऱ्या करत असतात. त्याच नसतील तर गाडी जागेवर बसून असते. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे वळाले आहेत. यासाठी त्यांनी कोठेही फार मोठे प्रशिक्षण घेतलेले नाही. इलेक्ट्रीक क्षेत्रातील प्राथमिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी हा व्यवसाय थाटला आहे. यामध्ये दिल्लीहून विविध बॅटऱ्यांचे सुटे भाग आणले जातात. ते एकमेकांना जोडून या बॅटऱ्या बनविल्या जातात. सुरुवातीस लहान लहान पाच सहा बॅटऱ्या जोडल्या जात होत्या. त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या समोर आल्याने आता एकच बॅटरी बनवून देऊ लागले आहेत. सातारा औद्योगिक वसाहतीत असे अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत. पूर्वी पेट्रोल-डिझेल गाड्यांची दुरुस्ती करणारे कारागिरही आता या व्यवसायाकडे वळाले आहेत.
चौकट
सार्वजनिक वाहतुकीतही संधी
सार्वजनिक प्रवासी वाहतूक क्षेत्रात एसटीचा दबदबा आहे. मात्र, कोरोनामुळे एसटीची चाके जागेवर थांबली होती. त्यामुळे एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. ते पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न एसटीचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत. मात्र, सध्या तरी एसटीचे आर्थिक गणित जुळेनासे झाले आहे. डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. त्यातच एसटीच्या ताफ्यात अलिकडील काही वर्षांत दाखल झालेल्या शिवशाही, शिवनेरी गाड्या वातानुकुलीत आहेत. त्या गाड्या बसस्थानकात लागल्यानंतर बंद करुन चालत नाहीत. त्यामुळे अशा गाड्यांना डिझेलचा वापर जास्त होतो. त्यामुळे अनेकदा डिझेलचा खर्च तरी निघेल का नाही याची खात्री देता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने इलेक्ट्रीक गाड्या रस्त्यावर आणण्याचा संकल्प केला आहे. यामुळे डिझेलवर होणारा मोठ्या खर्च वाचणार आहे. मात्र, एसटीसमोर सध्या काही अडचणी भासत आहेत. सातारा जिल्हा हा डोंगर उताराचा आहे. यामुळे गाड्यांना घाट चढून जाण्यासाठी जास्त ताकद लागते. यामुळे सातारा जिल्ह्यात हा प्रयोग कितपत यशस्वी होऊ शकतो. हे सांगता येत नाही. कारण बॅटऱ्या मध्येच डिस्चार्ज झाल्या तर काय करायचे ही समस्या आहे. मात्र, घाट रस्ता वगळून या गाड्यांचा चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो.
पर्यावरणाचे संवर्धन
कासला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या ठिकाणी उगवणारी फुले अन्य कोठेही पाहायला मिळत नाहीत. अशावेळी निसर्गाकडून सातारकरांना लाभलेल्या अमूल्य देणगीचे जतन, संवर्धन करणे प्रत्येक सातारकराचे कर्तव्य आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कासचा प्रचार व प्रसार झाल्याने जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक दाखल होत आहेत. ही बाब गौरवास्पद आहे. मात्र, त्याचवेळी हजारो गाड्या दररोज पठारावर येतात. धूर ओकणाऱ्या गाड्यांमुळे निसर्गावर घाला येत असतो. हे येथील निसर्गासाठी घातक आहे. अनंत मुंडीवाले विभाग नियंत्रक असताना त्यांनी केवळ कास पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन मिनीबसची सोय केली होती. तेव्हा एसटी महामंडळाने कास, महाबळेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळी इलेक्ट्रीक गाड्या नेऊन ठेवल्या तर तेथेच त्यांचा वापर चांगला करता येऊ शकतो. यामुळे एसटीचे उत्पन्न वाढेल आणि प्रदूषणापासून निसर्गाचे होणारे नुकसानही टाळण्यासाठी मदत होऊ शकते.
कोट :
साताऱ्याला निसर्गानेही भरभरुन निसर्गसंपदा दिली आहे. त्याचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करुन विजेवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक गाड्यांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.
- प्रा. डॉ. दादासाहेब नवले, सातारा.