सातारा : गौरी-गणपती सजावटीसाठी बाजारात अनेक नाविन्यपूर्ण वस्तू पाहावयास मिळत आहेत. आंबा, पेरु, चिकू, केळी, वांगी अशा फळभाज्यांच्या आकाराचे विद्युत दिवे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. लाडक्या बाप्पांच्या आगमानासाठी सातारकर आतुर झाले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांबरोबरच प्रत्येक घरात गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सजावटीत विद्युतरोषणाई करण्याकडे जास्त कल दिसून येत आहे. बाजारपेठेत विविध प्रकारची विद्युत उपकरणे विक्रीसाठी आली आहेत. विविध प्रकारच्या चायनीज माळा, रंगबिरंगी फोकस, कारंजे याबरोबरच विजेवर चालणारे अग्निकुंड लक्ष वेधून घेत आहे. यंदाही बाजारात चायनीज वस्तूंची रेलचेल दिसून येत आहे. विद्युतरोषणाईच्या साहित्यात दरवर्षी नवनवीन वस्तूंची भर पडत आहे. यंदा विद्युतमाळा, पणती, फिरते दिवे, रंगीत झाड, झिकझॅक माळा, तोरण, राईस माळा, फ्लॉवर लँप, झुंबर, शायनिंग बॉल तसेच विविध प्रकारचे कारंजे विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकही नाविन्यपूर्ण अशा वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत. धुराविना अग्निकुंड! अग्निकुंड म्हटले की आग अन् धूर डोळ्यांसमोर येतो. परंतु बाजारात यंदा विद्युत अग्निकुंड विक्रीसाठी आले आहे. कुंडात छोटा पंखा बसविला असून त्यावर लाल रंगाचे कापड लावण्यात आले आहे. या कपडावर लाल रंगाचा प्रकाशझोत सोडण्यात आला आहे. पंखा सुरू होताच हे कापड अग्निज्वालाप्रमाणे फडफडते व लाल प्रकाशामुळे जणू काही खरेखुरे अग्निकुंड असल्याचा भासते. (प्रतिनिधी)
विद्युतरोषणाईचे साहित्य फळभाज्यांच्या आकारात!
By admin | Published: September 15, 2015 11:48 PM