विश्वनाथ लक्ष्मण लाड (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील गुंजाळी येथील रहिवासी असलेले विश्वनाथ लाड हे आंब्रुळेतील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. रामापूर-पाटण येथे ते सध्या वास्तव्यास होते. बुधवार, १० सकाळी एका नातेवाइकाच्या विवाह सोहळ्यासाठी विश्वनाथ हे पत्नीसह मेंढोशी गावी गेले होते. त्याठिकाणी थोडावेळ थांबून पत्नीला त्याच ठिकाणी सोडून ते एकटेच घरी रामापूरला परतले. घरी आल्यानंतर त्यांनी घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याबाबतची खबर मृत विश्वनाथ लाड यांचे बंधू विठ्ठल लाड यांनी पाटण पोलीस पोलिसात दिली आहे. हवालदार के. आर. खांडे तपास करीत आहेत.
- चौकट
आजाराला कंटाळून आत्महत्या!
दरम्यान, या घटनेची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली असून, विश्वनाथ यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्या चिठ्ठीमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले; मात्र सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
फोटो : ११विश्वनाथ लाड