सागर गुजर ।सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिल्लीत पाठविण्यासाठी भाजपमधील प्याद्यांच्या हालचाली सुरू आहेत. दिल्लीच्या दिशेने उदयनराजे हत्तीच्या चालीनं निघाले असले तरी दुसऱ्या बाजूला राजेंच्या सत्तास्थानांना हादरे देण्याची व्यूहरचना आखून त्यांना गल्लीत चेकमेट करण्याची जोरदार तयारी राष्ट्रवादी काँगे्रसने सुरू केलेली आहे.
माजी खासदार उदयनराजे हे एप्रिल २०१९ मध्ये राष्ट्रवादी पक्षातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. मात्र, भाजपने त्यांना आपल्याकडे ओढले. तीनच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भाजपमध्ये डेरेदाखल झाले; परंतु लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा साताºयात होऊन देखील उदयनराजेंचा पराभव झाला. उदयनराजेंनी ‘रिस्क’ घ्यायला नको होती, असे सर्वच पक्षांतील कार्यकर्ते बोलून दाखवत होते. मात्र ‘जो मैं नहीं बोलता ओ मैं डेफिनेटली करता हूँ,’ असं म्हणत उदयनराजेंनी पोटनिवडणुकीच्या रणांगणात उडी मारली.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीत घात झाल्यास राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद देण्याचा अलिखित तह उदयनराजेंनी भाजपसोबत केला होता. त्या तहाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातील नेते साक्षीदार होते. या तहाची अंमलबजावणी करण्यासाठी या दोन नेत्यांना जीवाचे रान करायला लागले. आता २ एप्रिल रोजी रिक्त होणाºया राज्यसभेच्या जागेवर उदयनराजेंची वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित झालेले आहे. साहजिकच भाजपकडून उदयनराजे भोसले यांचा १३ मार्च रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. मुदत संपणारे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंना विरोध केला असला तरी राजेंना सोबत घेऊन भाजपला मोठे रान मारायचे असल्याने काकडेंना काहीही जुमला करून शांत करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत.
दुस-या बाजूला दोन्ही राजे भाजपमध्ये गेल्याने वर्षानुवर्षे ताब्यात असलेले साताºयाचे राजकीय तख्त पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अथवा त्यात किमान चंचूप्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचा आखायला घेतलीय. राजेंच्या जवळचे मोहरे गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादीने फासे टाकलेत. सध्या राजेंची बालेकिल्ल्यात झालेली ढिली पकड ही राष्ट्रवादीसाठी नामी संधी ठरू शकत असल्याने शशिकांत शिंदे यांनी हे गळ टाकून ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. आता यात कितपत यश येते, हे येणारा काळच ठरविणार आहे.
राष्ट्रवादीच्या पराभवाची दुखरी जखमकोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा तालुक्याचा काही भाग येतो. मागील निवडणुकीमध्ये माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिंदेंच्या विरोधात रान उठवले होते. त्यातून शिंदेंना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीने हुकमी पत्ता गमावला. विधानसभा दणाणून सोडणारा मोहरा गमवावा लागल्याने राष्ट्रवादी पक्षनेतृत्व तीव्र नाराज आहे. आता काहीही करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून राजेंच्या सत्तास्थानांना हादरे देण्याची खेळी खेळण्यासाठी राष्ट्रवादी आतूर झालेली आहे.इथे सारेच परेशान!विधानसभा निवडणुकीत सातारा आणि कोरेगाव तालुक्यांत अनेक राजकीय फेरबदल झाले. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला. तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे असा सामना झाला. त्यात शशिकांत शिंदेंना पराभव सोसावा लागला. साताºयातून शिवेंद्रसिंहराजे जिंकले; परंतु राज्यात भाजपला सत्ता येऊ शकली नसल्याने त्यांचे मंत्रिपद हुकले. उदयनराजेंनाही लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे इथे सारेच परेशान अशी स्थिती झाली. आता ही परेशानी दूर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.