सातारा : ‘राज्य शासनाकडे पुनर्वसन, दुष्काळ निर्मूलन व एकात्मिक पाणी वापराचा आराखडा पूर्वीच मांडला आहे. पण, भाजप सरकारही दुष्काळ, पुनर्वसन तसेच पवनचक्कीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नाही. आघाडी शासनाप्रमाणेच याही सरकारने शेतकऱ्यांना मारण्याचेच ठरवलेले दिसत असून, येत्या ९ आॅगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्रातील धरणांवर व पवनचक्क्यांच्या डोंगरांवर प्रकल्पग्रस्त आंदोलन करणार आहेत,’ अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘दुष्काळग्रस्त, धरणग्रस्त व पवनचक्कीग्रस्त आपापल्या प्रकल्पांच्या ठिकाणी जमून तीव्र संघर्षाचा एल्गार करणार आहेत. धरणग्रस्तांच्या पर्यायी जमिनी आणि दुष्काळग्रस्त कोरडवाहू शेती करणाऱ्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतांना अजूनही पाण्याचा लाभ झालेला नाही. मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊनही प्रत्यक्षात शेता-शेतावर पाणी पोहोचविण्याची यंत्रणा ५०-५० वर्षांनंतरही होत नाही. सरकारने निधी देऊन योजना पूर्ण केल्या पाहिजेत. या पाणीसाठ्यामध्ये ज्यांची गावे आणि जमिनी बुडाल्या त्यांचे पुनर्वसनही केले पाहिजे, तसे झाले नाही तर पावसाळ्यानंतर हजारोंच्या संख्येने आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येणार आहे. पवचक्कीग्रस्त शेतकऱ्यांना भाडेपट्टा मिळाला पाहिजे. पण, तो मिळत नाही. एकूणच दुष्काळग्रस्त, पवचनचक्कीग्रस्त व धरणग्रस्त शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार वर्षानुवर्षे सुरूच आहे. त्यामुळे हे आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील धरणांवर क्रांतिदिनी संघर्षाचा एल्गार
By admin | Published: August 02, 2015 12:08 AM