पेट्री : जैवविविधतेने नटलेल्या कास पठाराने आपल्या दुर्मीळ विविधरंगी फुलांच्या गालिच्याची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली. फुलांचा हंगाम सुरू होताच देश-विदेशातील पर्यटक कास पठाराला भेट देऊ लागले आहेत. जपानच्या परदेशी पाहुण्यांनी कास पठाराला भेट दिली. पठारावरील फुलं पाहून भारावलेल्या या परदेशी पाहुण्यांनीही आपल्या भाषेत ‘हिजो नी उत्सूकुशी हाना’ म्हणजेच ‘खूप सुंदर फुले’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, शनिवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही सहकुटुंब पठारावर हजेरी लावली. सातारा शहराच्या पश्चिमेस असलेले कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आाहे. विविधरंगी दुर्मीळ फुले हेच या पठाराचे मुख्य वैशिष्ट्य. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने असंख्य पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. विस्तृत पठार, ठिकठिकाणी कोसळणारे छोटे छोटे धबधबे, हवेतील थंडगार गारवा, चोहोबाजूला हिरवा निसर्ग, अधूनमधून दिसणारी धुक्याची दुलई त्यात नजर जाईल तिकडे विविधरंगी दुर्मीळ फुलांचे ताटवे असा मनाला मोहिनीटाकणारा स्वर्गीय सौंदर्याचा निसर्ग परदेशी पाहुण्यांना भुरळ पाडत आहे. चालू वर्षी कास पठाराला भेट देणाऱ्या जपानच्या परदेशी पाहुण्यांनी गतवर्षी देखील कास पठाराला फुलांच्या हंगामात भेट दिली होती. यंदाही जपानमधील काही पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. तसेच येथील प्रत्येक फुलाची त्यांनी बारकाईने पाहणी केली. निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागताना या पाहुण्यांनी ‘हिजो नी उत्सूकुशी हाना’ असं सांगून कासची फुले किती सुंदर आहे हे आपल्या भाषेत सांगितले.या अगोदर इंग्लड, जर्मनी या देशांतील परदेशी पाहुण्यांनीही कास पठाराला भेट दिली आहे. (वार्ताहर)गेंद, सीतेची आसवे, तेरडा या फुलांना आला बहरसध्या पठारावर निळी, लाल, पांढरी तसेच काही ठिकाणी पिवळ्या रंगाची फुले फुललेली दिसत असून, विविधरंगी फुलांचे गालिचे दिसू लागले आहेत. यामुळे कास पठार फुलांबरोबर हजारो पर्यटकांनी देखील बहरू लागले आहे. गेंद, सीतेची असवे, तेरडा असा एकत्रित विविधरंगी फुलांचा गालिचा पाहणे ही पर्यटकांसाठी आनंदाचीच पर्वणी असते. अशी पर्वणी अनुभवण्यास सुरुवात झाली असून, कित्येक पर्यटक हे नयनरम्य दृश्य आपापल्या कॅमेऱ्यात बंद करताना दिसत आहेत. हा फुलांचा हंगाम जास्त काळ टिकून राहण्यासाठी ऊन व पाऊस असे पोषक वातावरण राहणे अत्यावश्यक आहे. यामळे संपूर्णत: मदार निसर्गावर अवलंबून राहणार आहे.
जपानी पर्यटकांनाही भुरळ
By admin | Published: September 11, 2016 12:02 AM