कऱ्हाड : ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची अहमदनगर येथे विशेष कार्यकारिणी सभा झाली. त्यामध्ये शिक्षक नेते पदावरून संभाजी थोरातांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार त्यांच्याशी करू नयेत. त्यांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे आवाहन करीत लवकरच कऱ्हाडात मेळावा घेऊन कुणाच्या पाठीमागे किती जिल्हाध्यक्ष आहेत, हे दाखवून देऊ,’ असे मत राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे व सरचिटणीस वसंतराव हारुगडे यांनी केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजाराम वरुटे म्हणाले, ‘प्राथमिक शिक्षक संघात फूट पडल्यानंतर शिवाजीराव पाटील यांच्यानंतर वारसदार म्हणून संभाजीराव थोरात यांना शिक्षकांनी खूप प्रेम दिले; पण ज्या विश्वासाने त्यांच्यावर नेतेपदाची जबाबदारी दिली, त्या विश्वासाला ते पात्र राहिलेले नाहीत. शिक्षक संघाला प्रायव्हेट कंपनी बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ओरस, रत्नागिरी, शिर्डी येथील अधिवेशनाचा हिशेब त्यांनी अजून दिलेला नाही. याउलट हिशेब विचारणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कुरघोड्या करण्याचेच काम त्यांनी केले आहे. थोरातांच्या या विचित्र वागण्यामुळे अनेक चांगले नेतृत्व गुण असणारी माणसं संघटनेपासून दूर जात असून, संघटना दुबळी होत आहे. शिक्षकांचे प्रश्न सुटण्याऐवजी संघटनेतील प्रश्नांचाच गुंता वाढत चालला. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून सर्व जिल्हाध्यक्षांनी अधिवेशनाचा हिशेब देऊन सन्मानाने बाजूला होण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी तो ऐकला नसल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.’ (प्रतिनिधी)
संभाजी थोरात यांची शिक्षक संघातून हकालपट्टी
By admin | Published: August 31, 2014 10:15 PM