लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या वतीने आयोजित प्रशिक्षणासाठी निवड झालेला सातारा जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रिकेटपटू व खावली (ता. सातारा) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी तुषार गणपत कांबळे (वय १६) याचा शुक्रवारी सकाळी धावताना हृदयावर ताण वाढल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या आकस्मिक मृत्युमुळे नवोदय परिवारासह अतित गावाला मोठा धक्का बसला आहे.
मूळचा सातारा तालुक्यातील अतितचा रहिवासी असलेला तुषार हा नवोदयमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिकत होता. तो अभ्यासात अत्यंत हुशार होताच, पण खेळामध्येही त्याने नाव कमावले होते. त्याचा फिटनेस उत्तम होता. बास्केटबॉलमध्ये विद्यालयाच्या संघातून गोव्यात तसेच गुजरातमध्ये जामनगरला त्याने चमकदार कामगिरी केली होती. एनडीएला जाण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यादृष्टीने तो चिकाटीने अभ्यास व सराव करत होता. दरम्यान, तुषार हा शुक्रवारी सकाळी सात वाजता चुलत भावासमवेत रनिंगसाठी बाहेर पडला. दोघेही धावू लागले. मात्र, तुषार हा धावता धावता खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या चुलत भावाने त्याला दुचाकीवरून नागठाणे येथे नेले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
तुषारने अलीकडेच आरसीबीच्या शिबिरात गोलंदाजीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर दिनांक १७ रोजी त्याला पुन्हा नाशिकला बोलावण्यात आले होते. परंतु तत्पूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे वडील गणपत कांबळे हे कराटे व मार्शल आर्टचे प्रशिक्षक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने मरून बेल्ट प्राप्त केला होता. शिवकालीन दांडपट्टा, तलवारबाजी या मर्दानी खेळातही तो पारंगत होता.
त्याच्या अशा अकस्मात एक्झिटमुळे सर्वांनाच धक्का बसला.
जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रवी लाड यांनी तुषारचे अंत्यदर्शन घेऊन त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. नवोदय परिवार एका हुशार व चांगल्या विद्यार्थ्याला मुकला आहे. संपूर्ण नवोदय परिवार या दु:खात सहभागी आहे, अशा शब्दात त्यांनी तुषारला श्रध्दांजली अर्पण केली.