खटाव : ‘खटावला राजकीय वारसा आहे तसाच याच खटावच्या मातीतून नामवंत खेळाडूही उदयास आले आहेत. त्यांच्या विषयी माहिती व जुन्या आठवणींना उजाळा केसीसी -द रिअल स्टोरी या पुस्तकाच्या माध्यमातून मिळाला आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रिया महेश शिंदे यांनी केले.
खटावमधील केसीसी क्रिकेट संघाचा जिल्ह्यात दबदबा असणाऱ्या संघाबद्दल तसेच खेळाबद्दल माहिती व जुन्या आठवणींना उजाळा देणारे ‘केसीसी- द रिअल स्टोरी’ हे पुस्तक संजय देशमुख यांनी लिहिले आहे. पुस्तक प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य एन. एस. गोडसे, अशोक कुदळे, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, मनोज देशमुख, संजय जाधव, आर. एन. पवार, धनंजय क्षीरसागर उपस्थित होते.
प्रदीप विधाते म्हणाले, ‘दिवसेंदिवस डिजिटलच्या जमान्यात व्यायाम, तसेच खेळ याकडे तरुण कानाडोळा करत आहेत. एक वेळ अशी होती केसीसी खटावचा दबदबा संपूर्ण जिल्ह्यात होता. खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे काम प्रेक्षकांमध्ये बसून मी करत होतो’
पुस्तक प्रकाशनानिमित्त खटावमधील सर्व राजकीय पक्षांतील नेते एका मंचावर पाहावयास मिळाले. सर्व पक्षीय कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमापूर्वी केसीसी खटाव व खटाव तालुका इलेव्हन या संघादरम्यान प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही संघांतील सहभागी खेळाडूंना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
२४खटाव-बुक
खटाव येथील संजय देशमुख यांनी लिहिलेल्या केसीसी- द रिअल स्टोरी पुस्तक प्रकाशन प्रदीप विधाते, डॉ. प्रिया शिंदे, राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. (छाया : नम्रता भोसले)