फलटण : ग्रामपंचायतीचा कारभारी होण्यासाठी उमेदवारांचा छुप्या प्रचारावर भर दिसतोय. फलटणच्या पश्चिम भागातील ग्रामपंचायतीसाठी दि. १५ जानेवारीला मतदान होत आहे. यामध्ये नांदल, साखरवाडी , निंभोरे, खराडेवाडी, घाडगेमळा, वडजल, भिलकटी या महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी एकाच गटातील दोन उमेदवार समोरासमोर उभे राहिल्याने उघड प्रचार करताना समर्थकांची अडचण होत आहे.
भावकी आणि गावकी यात समतोल राखताना समर्थक प्रचारक यांनी छुप्या प्रचारावर भर दिला आहे. त्यामुळे कुणालाही नाराज न करता लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न प्रचारक व समर्थक करत आहेत. एकाच भावकीतील दोन उमेदवार समोरासमोर आल्याने प्रचारासाठी कुणाबरोबर फिरायचे, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. म्हणूनच घरोघरी, शेतात, कामाच्या ठिकाणी, कुणाच्या सासरी, तर कुणाच्या माहेरी, कुणाचा मामा, तर कुणाची आत्या ही सर्व नाती प्रचारात उतरवून एकदम शांततेत प्रचार सुरू आहे.
प्रचारासाठी प्रचार फेरी काढून आपले पत्ते उघड करण्यापेक्षा पाहुण्यांमार्फत प्रचार केला जात आहे. यासाठी रात्री सात-आठनंतर प्रत्यक्ष गाठीभेटींवर व आपल्याच समर्थकाला मत देण्याचा शब्द घेण्यात येत आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे छुपे प्रचारक वेगाने सक्रिय होत आहेत. करून सवरून नामानिराळे राहणारे हे प्रचारक या निवडणुकीत रंगत आणत आहेत.
कोट..
सोशल मीडिया आल्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. तरुण कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन निष्क्रिय लोकांना घरचा रस्ता दाखविण्याचे ठरवले आहे. यासाठी प्रत्यक्ष भेटून मतदाराचे मतपरिवर्तन करण्यावर तरुण पिढीला कल आहे.
- धनाजी सरक, नांदल