सातारा : सातारा शहरातील पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता, व्हॉल्व्हची दुरुस्ती यासह हद्दवाढीतील पाणी योजना मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील. असा निर्णय सातारा पालिकेत झालेल्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
पाणीपुरवठा समितीची बैठक सोमवारी सकाळी कमिटी हॉलमध्ये पार पडली. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे, नगरसेवक वसंत लेवे, धनंजय जांभळे, नगरसेविका आशा पंडित यांच्यासह पाणीपुरवठा व जीवन प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सातारा पालिकेच्या सभापती निवडी नुकत्याच झाल्या. यानंतर प्रथमच पाणीपुरवठा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सदस्यांनी शहरातील पाणी वितरण व्यवस्था, त्यातील अडचणी, कर्मचाऱ्यांची संख्या, साठवण टाक्यांची सुरक्षा आदी विषयांवर सूचना मांडल्या. नगरसेवक वसंत लेवे यांनी पालिका हद्दीत आलेल्या दरे बुद्रुक येथील पाणी टाकीचा विषय चर्चेस आणला. टाकीच्या कामाला कार्यारंभ आदेश केव्हा देण्यात आला, हे काम अर्धवट का ठेवण्यात आले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जलवाहिनी अथवा व्हॉल्व्हला गळती लागल्यानंतर रस्त्यात खोदकाम केले जाते. हे खड्डे पुन्हा भरले जात नाहीत. ही बाब गंभीर असल्याचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी निदर्शनास आणून दिले.
पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे यांनी पाणी वितरण व्यवस्थेतील अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. पालिका हद्दीत आलेल्या खेड, विलासपूर, दरे, शाहूपुरी, करंजे येथील पाणीपुरवठ्याची माहिती त्यांनी जीवन प्राधिकरणकडून घेतली. नगराध्यक्षा माधवी कदम व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनीही शहराची पाणी वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलणार असल्याचे सांगितले.