कºहाडातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी पोलीस अधिक्षक बन्सल यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस खात्याकडून नेहमीच पुढाकार घेऊन कारवाई केली जात आहे. ‘ब्रेक दी चेन’ लागू झाल्यापासून सव्वा दोन कोटी दंड पोलीस प्रशासनाने वसूल केला आहे. त्यावरूनच पोलिसांची कार्यक्षमता दिसून येते. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसह इतर बाबीतही पोलिसांनी पुढाकार घेत कारवाई केली आहे. शहरी भागात संक्रमणाचा वेग कमी आला आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही संक्रमण जास्त आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येक गावावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गृह विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. त्यासाठी गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. ज्या गावामध्ये रुग्णसंख्या जास्त आहे किंवा पॉझिटीव्हीटी रेट वाढला आहे त्या गावामध्ये प्रामुख्याने संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यातुनही एखाद्या रुग्णाला गृह विलगीकरणातच रहायचे असेल तर शिक्क्यांचे नियोजनही केले आहे. संबंधिताच्या हातावर आशा सेविकांमार्फत शिक्का मारला जाणार असून त्यानंतरच त्याला गृह विलगीकरणात राहता येईल.
हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाचे नातेवाईक शहरात फिरताना आढळतात. अनेकजण नातेवाईक अॅडमिट असल्याचे खोटे कारण सांगुनही फिरत आहेत. हे थांबविण्यासाठी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची सोय व्हावी, यासाठी रुग्णालयामार्फत एका नातेवाईकाला पास देण्याचे नियोजन केले आहे. पास असेल तरच त्या नातेवाईकाला रुग्णालयात प्रवेश मिळेल. तसेच त्या नातेवाईकावर पोलिसांकडूनही कारवाई केली जाणार नाही. ब्रेक दी चैन ही मोहिम यशस्वी करण्यासाठी कडक लॉकडाऊनमध्ये नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अधिक्षक बन्सल यांनी यावेळी केले.
- चौकट
कºहाडवर ड्रोनद्वारे ‘वॉच’
कºहाड शहरात मंगळवारपासून कडक लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन करण्यात आले आहे. शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच शहरावर ड्रोन कॅमेºयाद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहितीही पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी यावेळी बोलताना दिली.