सातारा : सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ सोमवारी पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आरोग्य व कोरोना विभाग वगळता दैनंदिन कामकाज ठप्प झाले.
बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराची कानउघाडणी करताना मुख्याधिकारी अभिजित बापट यांना आक्षेपार्ह शब्द वापरले होते. या वार्तालापाची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्याने सातारकरही अवाक झाले होते. या प्रकरणाचे तीव्र पडसाद पालिकेच्या राजकीय वर्तुळातही उमटले. सिद्धी पवार यांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. पालिका कार्यालयाची दोन्ही प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली होती. केवळ आरोग्य व कोरोना विभाग वगळता पालिकेतील इतर विभागांचे कामकाज दिवसभर ठप्प होते. केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी पालिकेत उपस्थित होते.
सातारा पालिका कर्मचारी युनियन (लाल बावटा) व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन या संघटनांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, सेवा केंद्रात आवश्यक दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना आंदोलनाची कल्पना नसल्याने आल्या पावली माघारी जावे लागले. झालेल्या प्रकाराबाबत निषेध नोंदवून कर्मचाऱ्यांनी पालिकेचे कामकाज पुन्हा सुरू ठेवणे गरजेचे असते. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून काय उपयोग? अशा भावना कामकाजानिमित्त आलेल्या नागरिकांनी व्यक्त केल्या.
(कोट)
पालिकेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने मुख्याधिकाऱ्यांना अपशब्द वापरणे निंदाजनक आहे. त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. प्रशासन व पदाधिकारी यांनी योग्य समन्वय राखून काम करावे. कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईकांकडून असे प्रकार घडू नयेत.
- गणेश दुबळे, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन
(कोट)
पालिकेच्या इतिहासात अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाण करण्याचे प्रकार अनेकदा घडले. पण प्रत्येक वेळी मिटवून घेण्यात आले. या वेळी खुद्द मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ झाली आहे. यासाठी नेत्यांनी नगरसेवकांना सूचना द्याव्यात. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो.
- श्रीरंग घाडगे, सरचिटणीस, म्युनिसिपल कामगार युनियन, लाल बावटा
(कोट)
जबाबदार अधिकाऱ्यांचा असंविधानिक शब्दप्रयोग करून अवमान करणे अत्यंत चुकीचे आहे. मुख्याधिकारीच नव्हे तर कोणत्याही अधिकाऱ्याला अपशब्द वापरणे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारामुुळे पालिकेचे वातावरण कलुषित होत आहे. हे प्रकार कुठेतरी थांबायला हवेत.
- चंद्रकांत खंडाईत, अध्यक्ष, अखिल कर्मचारी महाराष्ट्र संघ, सातारा
फोटो : १४ जावेद खान
बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. (छाया : जावेद खान)