ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 21 - एका सात वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करणा-या मिराज युसूफ सय्यद याला पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्लू देशपांडे यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षाची सुनावली आहे. दंड न दिल्यास चार महिने साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
१३ मे २०१५ रोजी संबंधित बालिकेला दुकानात पाठवायचे आहे, असे सांगून मिराज सय्यदने बोलावून घेतले. त्यानंतर त्याने घरात कोणी नसताना तिच्यावर जबरदस्तीने अत्याचाराचा प्रयत्न केला. हा प्रकार संबंधित बालिकेच्या वडिलांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बालिकेची त्याच्या तावडीतून सुटका केली.
सय्यदच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने मिराज सय्यद याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्याचा केवळ दीड वर्षात निकाल लागला. (प्रतिनिधी)