परळी : सज्जनगडाचा दासनवमी उत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्र राज्याबरोबरच देशातील मॉरेशिस, सिंगापूरच्या भाविकांची ओढ सज्जनगडाकडे लागली आहे. अशातच प्रशासन भाविकांच्या अडीअडचणी दूर करून अजून कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा पुरविणार आहे, याची उत्सुकता भाविकांना लागून राहिली आहे.सज्जनगडावर दि. ४ फेब्रुवारी पासून १४ फेब्रुवारीपर्यंत येथे दासनवमी उत्सव सुरू होत आहे. या उत्सवात लाखो भाविक सज्जनगडावर येतात. समर्थ रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ महाप्रसाद व मुक्कामी येणाऱ्या भाविकांची उत्तम प्रकारे सोय करतात. मात्र, याठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सज्जनगड फाटा ते भातखळे या रस्त्यावर वीस वर्षांपूर्वी डांबर पडावे, रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, याबाबत चर्चा होते. मात्र, त्यांची अंमलबजावणी अद्यापही होत नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती, वाहनतळ, तटबंदीसाठी निधीही मंजूर झाला. मात्र, प्रत्यक्ष कामास अद्यापही सुरुवात नाही. बसस्थानक परिसरात प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य, बसस्थानकावर महिलांना स्वच्छतागृह नाही. पिण्याची पाणी नाही, बसण्यासाठी कठडे नसल्याने गैरसोय होते. सज्जनगडावरील पाण्याची तळीही अस्वच्छ आहेत. (वार्ताहर)सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्याची मागणीयात्रा कालावधीत हजारो संख्येने समर्थभक्त सज्जनगडावर येतात. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास तो कोणी केला, यासाठी समर्थ रामदास स्वामी संस्थानच्या वतीने क्लोज सर्किट टी. व्ही. (सी. सी. टी. व्ही.) कॅमेरे बसविले आहेत. ही कौतुकाची बाब आहे; परंतु फक्त मंदिर परिसरात आहेत ते इतर ठिकाणी याची मागणी होत आहे.सज्जनगड यात्रा नियोजनाची बैठक येत्या दोन दिवसांत होणार आहे. यासंबंधी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असून, यात्रा कालावधीत भाविकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. वाहतूक, स्वच्छता, गर्दीवर नियंत्रणासाठी विविध योजना करण्यात येणार आहेत.- संजय बैलकर, मंडलाधिकारी, परळी
भाविकांना उत्सुकता प्रशासनाच्या नियोजनाची
By admin | Published: February 01, 2015 9:00 PM