वाठार निंबाळकर : ‘कायम दुष्काळी भागात रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून धोम-बलकवाडीचे पाणी आले. त्याचा उपयोग करून झडकबाईचीवाडी येथील तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यात होणाऱ्या पिकांची शेती केली. त्यामुळे तरुण पिढीला शेती व्यवसायाविषयी प्रोत्साहन मिळत आहे,’ असे प्रतिपादन सत्यजितराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
झडकबाईवाडी, ता. फलटण येथील तरुण शेतकरी राधेश्याम कदम व घनश्याम कदम यांनी तयार केलेल्या शेडनेटमधील पिवळ्या व लाल रंगाची ढोबळी मिरची पिकाच्या शेतावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रगतिशील बागायतदार लालासाहेब कदम उपस्थित होते.
सत्यजितराजे म्हणाले, ‘सगळीकडे शेती परवडत नाही, अशी अवस्था झाली असली तरीही राधेश्याम व घनश्याम कदम यांच्यासारखे काही शेतकरी नवीन प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून निर्यातक्षम पिकाची लागवड केली. अधिक प्रमाणात नफा मिळवीत असून ही बाब इतर शेतकरी व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तरुणांनी आता नोकरीच्या मागे न लागता गावातच राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उद्योजक बनावे.’
यावेळी सरपंच रवींद्र शिंदे, श्रीमंत मुळीक, उत्तम नलवडे, अनिल शिंदे, बापू बनसोडे, किरण नलवडे, बाळकृष्ण शिंदे, कार्तिक शिंदे उपस्थित होते. डॉ. शशिकांत कदम यांनी स्वागत केले. घनश्याम कदम यांनी प्रास्ताविक केले, तर चैतन्य कदम यांनी आभार मानले.