फलटण : फलटण नगरपालिकेच्या राजधानी टॉवरमध्ये झालेले अवैध बांधकाम तातडीने पाडण्यात यावे, तसे न केल्यास नागरिक रस्त्यावर उतरून ज्यांची दुकाने नगरपालिकेने पाडली ती त्याचठिकाणी पुन्हा बांधतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी पालिकेची असेल, असा इशारा विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.
याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण पालिकेने गेल्यावर्षी अतिक्रमणाच्या नावाखाली व्यापारी व छोट्या दुकानदारांची दुकाने कोणतीही नोटीस न देता उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावर आणले. तीच नगरपालिका स्वतःच्या शासकीय जागेत झालेले अतिक्रमण जर अधिकृत करून देत असेल तर फलटणमधील गरीब दुकानदारांची दुकाने अधिकृत करून द्यावीत.
राजधानी टॉवरमधील दुकानांना पूर्ववत करण्याच्या अटीवर परवानगी देत असाल तर गोरगरीब जनतेलाही त्यांची दुकाने पुन्हा पूर्ववत करून देतील, याच अटीवर फलटण शहरातील व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात यावी. अन्यथा राजधानी टॉवरमधील झालेले बांधकाम पाडण्यात यावे. तसे न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून ज्यांची दुकाने नगरपालिकेने पडली ती त्याच ठिकाणी पुन्हा बांधतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल, याची मुख्यधिकारी यांनी नोंद घ्यावी, असा इशारा समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.