सातारा : येथील राजवाडासमोरील अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या पार्किंगमधील अतिक्रमण अखेर बुधवारी रातोरात काढल्याने आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी राजीनामा मागे घेतला.
अभयसिंहराजे भोसले संकुलाच्या पार्किंगमध्ये काहीजणांनी गणपतीचे स्टॉल उभारून अतिक्रमण केल्याची तक्रार आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे केली होती. या अतिक्रमणाला सत्ताधारी नगरसेवकांचाच हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
हे अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, या मागणीसाठी वसंत लेवे आणि नगरसेविका सुनीता पवार यांनी बुधवारी सकाळी पालिकेच्या दालनात उपोषण केले होते. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांची कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेले सभापती वसंत लेवे यांनी गुरूवारी सकाळी नगराध्यक्ष माधवी कदम यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी रात्री संबंधित अतिक्रमण धारकांना पार्किंगमधील स्टॉल हटविण्यास सांगितले. त्यानुसार विक्रेत्यांनी स्टॉल हटविले. वसंत लेवे हे नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी पालिकेत आले. यावेळी त्यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याशी चर्चा केली. अतिक्रमण काढण्यात आले असून तुमची मागणी मान्य झाली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर लेवे यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले.
नगर विकास आघाडीतून सातारा विकास आघाडीत प्रवेश केल्यापासून सभापती वसंत लेवे यांनी राजीनामा देण्याच्या इशाºयाची ही दुसरी वेळ आहे.