कऱ्हाड : येथील बस स्थानक ते विजय दिवस चौक परिसरातील रस्त्याकडेला चायनीज, वडापाव, तसेच फळविक्रेते व साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी, विद्यार्थी व प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागत आहेत. कऱ्हाड पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्वच्छता गरजेची
कऱ्हाड : शहर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकात सुशोभीकरणासाठी फुलझाडे लावण्यात आली आहेत. सद्यस्थितीत स्वच्छता आणि देखरेखीअभावी दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. या दुभाजकात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गवत व अनावश्यक झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे फुलझाडांचे नुकसान होत आहे.
वहागावात वृक्षारोपण
कऱ्हाड : वहागाव, ता.कऱ्हाड ग्रामपंचायत आणि सरपंच संग्राम पवार यांच्या संकल्पनेतून गावातील मुख्य रस्त्यालगत ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच संग्राम पवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, निवास पवार, दिनकर पवार, दीपक पवार आदी उपस्थित होते.
वाहनांवर कारवाई
कऱ्हाड : शहरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नियमबाह्य नंबरप्लेट पोलीस जप्त करीत आहेत, तसेच संबंधित वाहनधारकाला दंडही केला जात आहे. वाहनधारकांनी फॅन्सी नंबरप्लेट वाहनाला वापरू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.