रस्त्यावरील खडीमुळे त्रस्त
सातारा : शहरातील मुख्य चौकासह अंतर्गत भागात रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात आलेले आहे. काम संपल्यानंतरही त्या परिसरात खडी तशीच पसरलेली असल्याने त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना त्रास होत आहे.
गायींचे प्रमाण वाढले
कोरेगाव : शहरात मोठ्या संख्येने मोकाट गायींचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. शहरातील दुभाजकांवरच या मोकाट गायी बसत असल्याने त्यांचा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
टरबुजाची मागणी वाढली
वाई : आहारासाठी उत्तम असलेल्या टरबूज फळाची मोठ्या प्रमाणात सध्या येथील बसस्थानक व मंडई परिसरात विक्री केली जात आहे. अगदी स्वस्त दराने टरबुजाची विक्री केली जात असल्याने याची खरेदीही मोठ्या प्रमाणात नागरिक करीत आहेत.
पाणंद रस्त्यावर खड्डे
वाई : येथील शेतशिवारातील पाणंद रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे तसेच सतत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे.
वाहनांमध्ये अपघात
विंग : कऱ्हाड - ढेबेवाडी या मार्गावर शिंदेवाडी फाटा व चचेगाव फाटा या ठिकाणी असलेल्या धोकादायक व तीव्र वळणामुळे दुचाकी वाहनधारकांमध्ये अपघात होत आहेत. या ठिकाणी असलेले दिशादर्शक फलक व रिफ्लेटरही तुटले आहेत.
माची पेठेतील रस्त्याची चाळण
सातारा : गुरुवारपेठ येथील कुपर कंपनी, गणेश मंदिर ते परदेशी घर येथील रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. या रस्त्याची खड्डयामुळे चाळण झाली असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे.
गतिरोधकाची मागणी
तांबवे : कऱ्हाड - चिपळूण मार्गावर असलेल्या वसंतगड बसस्टॉपवर प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. भरधाव वेगात वाहनांची ये-जा सुरू असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. येथे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कचऱ्याचे वाढते साम्राज्य
शिरवळ : पुणे - बंगळुरू महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे नागरिक व प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.
............