ऑनलाइन लोकमत
पुसेगाव, दि. 14 - खटाव येथील मुख्यबाजारपेठेतून जाणा-या सातारा-पंढरपूर राज्यमार्गाच्या रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम १४ एप्रिलपासून अखंडपणे सुरू करण्याची ग्वाही बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिका-यांनी दिली. या राज्यमार्गावरील पुसेगाव अंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी ठरल्याप्रमाणे ग्रामस्थांतर्फे जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नारायणगिरी सभागृहात झालेल्या पुसेगाव ग्रामस्थ व बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या बैठकीत घेण्यात आला.
आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. दरम्यान बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाचे काम बांधकाम विभागाच्या हद्दीत आमदार विकास निधीतून करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.
ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यानंतर मध्यंतरी रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला. परंतु बांधकाम विभागाने ते काम अर्धवट सोडल्याने व गटारांची सोय नसल्याने सेवागिरी मंदिर ते जुनी ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थांनी सांडपाणी रस्त्यावर सोडल्याचे आमदार शिंदे यांनी बांधकाम अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी रहदारीस अडथळा होणार नाही अशा रितीने किमान नऊ मीटर रुंदीचा रस्ता दोन्ही बाजूंच्या गटारांसह करण्यात यावा तसेच एकदा सुरु झालेले काम नॉनस्टॉप करण्यात यावे, अशी मागणी आमदार शिंदे व ग्रामस्थांनी बैठकीत केली.
या रस्ता रुंदीकरणास शनिवारी प्रारंभ करण्यात येईल. तसेच रस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध असलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीतून हे काम सलगपणे करण्याची तसेच दुतर्फा गटारे काढून देण्याची ग्वाही यावेळी अधिका-यांनी दिली. जर दबावामुळे अथवा अडथळ्यांमुळे काम बंद पडले तर त्यास संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील व त्याविरुद्ध ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस मठाधिपती सुंदरगिरी महाराज, पुणे येथील कार्यकारी अभियांता डी. व्ही. टिसोळकर, मुख्य अभियंता संभाजी माने, मुख्य कार्यकारी अधिकारी एल. एन. वाघमोडे, अभियंता जावळकोटी, अभियंता सुनिलकुमार, वडूज विभागाचे अभियंता संभाजी जाधव, सेवागिरी ट्रस्टचे विश्वस्त सुरेशशेठ जाधव, माजी उपसरपंच बाळासाहेब जाधव, सुनिल जाधव,जगनशेठ जाधव,अशोकराव जाधव, रामभाऊ जाधव, गणेश जाधव, मनोज जाधव, राजू गाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्वच्छतागृहांसाठी १० लाखांचा निधी
गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील बसस्थानक परिसरात असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह पाडण्यात आल्याने येथील ग्रामस्थ व प्रवाशांची मोठी गैरसोय सुरु आहे. या स्वच्छतागृहासाठी बांधकाम विभागाच्या हद्दीत जागा उपलब्ध झाल्याने आमदार शिंदे यांनी दहा लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला असून लवकरच हे कामही मार्गी लागणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.