कुकुडवाड : पूर्वीच्या काळी महादेवाच्या डोंगररांगा तसेच ऐतिहासिक महत्त्व असणारा कुकुडवाडचा डोंगर सध्या ‘पवनचक्क्यांचा डोंगर’ बनला आहे. त्यामुळे ही ठिकाणे दुष्काळी भागातील एक उर्जा निर्मितीचा केंद्रबिंदू बनली आहेत. दरम्यान, पवनचक्क्यांमुळे जमिनीचे दरही एकरी पाच लाखांवर गेले आहेत. माण तालुक्यात विस्तीर्ण स्वरूपात, भल्यामोठा लांबच्या लांब अशा स्वरूपात परिसराला वळसा घातलेला असा कुकुडवाडचा डोंगर आहे. नागमोड्या स्वरूपात कुकुडवाड, आगासवाडी, मानेवाडी, पुकळेवाडी, विरळी, नरवणे असा कुकुडवाडचा डोंगर आहे. पूर्वी हिरवळीने नटलेला, झाडाझुडपांनी बहरलेला तसेच करवंदाच्या जाळ्याचा हा डोंगर होय. बदलत्या कालावधीत दुष्काळाच्या झळा बसून भला मोठा डोंगर उजाड बनला. मोठी झाडे-झुडपे नष्ट झाली. करवंदाच्या जाळ्या फक्त नावाला शिल्लक राहिल्या आहेत. शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागालाही या डोंगराचा विसर पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील भलामोठा नैसर्गिक ठेवा काळाच्या ओघात उजाड झाला. बाज्याबैज्याच्या बंडाची झालर असणारा कुकुडवाड खिंडीचा परिसर व डोंगराळ भागाने सध्या नवीन रूप धारण केलेले आहे. मेंढ्या व चराऊ जनावरांना चरण्यासाठी वापरण्यात येणारा डोंगराळ भाग गेल्या काही वर्षांपूर्वी पवनचक्क्या बसविण्यासाठी वापरात येऊ लागला. विविध कंपनीच्या मालकांनी या जमिनीची खरेदी करून पवनचक्क्या उभारण्यात आलेल्या आहेत. कधी काळी पाच हजार रुपये प्रति एकर या भावाने विकणारी जमीन पवनचक्की मालकाच्या स्पर्धेमुळे पाच लाख एकर अशी उच्चांकी झाली आहे. हे पाहता पाहता ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा असणारा कुकुडवाडचा डोंगर पवनचक्क्यांचा डोंगर म्हणून मिरवत असल्याचे दिसून येत आहे. आज या डोंगरावर शेकडो पवनचक्क्यांची पाती फिरत आहेत. या डोंगरावर विविध वीजनिर्मिती कंपनींनी प्रकल्प उभारले आहेत. या पवन ऊर्जा प्रकल्पाचे महत्त्व म्हणजे एका दिवसामध्ये पुरेशा वाऱ्यापासून व एका पवनचक्कीपासून छत्तीस हजार युनिट एवढी ऊर्जा तयार केली जाते. पवनचक्कीची उंची ८५ मीटर व पात्याची लांबी ३६ मीटर इतकी आहे. (वार्ताहर) डोंगरावर आता भले मोठे रस्ते...माण तालुक्यात असणारा वेगाचा वारा. त्याद्वारे होणारी वीजनिर्मिती यातून या परिसराला नवे औद्योगिक स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पवनचक्क्या उभारणीच्या कालावधीत हजारो युवकांच्या हाताला काम मिळाले. मात्र नंतर मोजक्याच लोकांना नोकरी मिळाली आहे. कधी काळी डोंगरावर माणसाशिवाय कोणी जात नव्हते. आता पवनचक्कीच्या साहित्य वाहतुकीसाठी भलेमोठे रस्ते तयार झाले आहेत. त्याद्वारे दळणवळणाची सुविधा वाढली आहे. माण तालुक्यात नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या वाऱ्यापासून पवनचक्की उभारणीद्वारे वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्याठिकाणचा विकास झाल्याचे दिसून येत आहे.
ऐतिहासिक परिसरात ऊर्जानिर्मिती
By admin | Published: May 02, 2016 11:06 PM