रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरानजीक असलेल्या नहरवाडी गावच्या हद्दीतील कृष्णा नदीपात्रात वाळू चोरट्यांकडून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारभावानुसार सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सुमारे तीन ब्रासपेक्षा जास्त वाळू जप्त केली. मात्र, वाळू चोरटे अद्याप मोकाट आहेत.
यंदा सुमारे पाच महिने मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे ओढे, नाले व नदी ओसंडून वाहिली. पूरजन्यस्थितीमुळे कृष्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाहून आलेली वाळू साचली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर नदीकाठापर्यंत जाणारे रस्तेही पुन्हा पूर्वपदावर आले आहेत.
नदीची पाणी पातळी नेहमीच्या पातळीवर आल्यामुळे नदीच्या आजूबाजूने फिरताना पुराबरोबर वाहून आलेली प्रचंड वाळू नजरेस पडत आहे. वाळू चोरटे त्यामुळे आता सक्रिय झाले आहेत. वाळू उपसा करून वाहतूक करताना पोलिसांचा आणि महसूल प्रशासनाचा ससेमिरा चुकवण्यासाठी वाळू चोरटे रात्री-अपरात्री व पहाटे वाळू उपसा करून वाहतूक करण्यावर जोर देत आहेत.गेल्या काही दिवसांपासून नहरवाडी गावच्या हद्दीतील कृष्णा नदीपात्रात रात्रीचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. नदीकाठी काही वाळूचे डेपो तर नहरवाडी -रहिमतपूर या रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये आडबाजूला काही वाळूचे डेपो मारले जात आहेत.
या डेपोमधूनच ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून वाळूची वाहतूक सुरू आहे. वाळू चोरटे शासकीय यंत्रणेचा डोळा चुकवून बेसुमार वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची खबर रहिमतपूर येथील महसूल कर्मचाऱ्यांना मिळाली. मंडलाधिकारी व तलाठी यांनी सापळा रचून गेल्या पंधरा दिवसांत नहरवाडी गावच्या हद्दीतील कृष्णा नदी पात्राशेजारील व रस्त्याकडेच्या वाळू डेपोतून बाजारभावानुसार ४५ हजार रुपये किमतीची तीन ब्रासपेक्षा जास्त वाळू जप्त केली.
महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू चोरट्यांच्या उपसा उपशाला तात्पुरता का होईना लगाम लागला आहे. मात्र, ही तोकडी कारवाई वाळू चोरट्यांना किती दिवस चाप बसवण्यास उपयुक्त ठरेल? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वाळू जप्त अन् चोरटे मोकाटपावसाच्या उघडीपीनंतर आजअखेर वाळू चोरट्यांनी लाखो रुपयांचा वाळू उपसा करून वाहतूक केली आहे. कृष्णा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून काही प्रमाणात पावले उचलली गेली आहेत. वाळू उपसा रोखण्यासाठी केवळ डेपोमधील वाळू जप्त करून मोकाट असलेल्या वाळू चोरट्यांना लगाम बसणार नाही. तर चोरट्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे बनले आहे.शासकीय यंत्रणेला चॅलेंज...कृष्णा नदीपात्रात रात्रीचा वाळू उपसा सुरू असतो, याची माहिती शासकीय यंत्रणेला आहे. परंतु वाळू उपसणाऱ्याच्या भीतीने शासकीय यंत्रणा रात्री कारवाई करण्यास धजावत नाही. अशी दर्पोक्ती वाळू उपसून विकणारे चोरटे करत असल्याची चर्चा रहिमतपूर परिसरात सुरू आहे. एक प्रकारे वाळू चोरटे शासकीय यंत्रणेला चॅलेंज करत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शासकीय यंत्रणा रात्रीची वाळू चोरट्यांवर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.