कोरेगाव : पुण्याहून कोल्हापूरला जाणारी फास्ट डेमू रविवारी दुपारी तीन वाजता कोरेगाव रेल्वे स्थानकात दाखल झाली. तेथून पुढच्या प्रवासाला निघत असताना, तिच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ती तब्बल दोन तास एकाच जागेवर उभी होती. तांत्रिक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाचच्या दरम्यान तिला कोल्हापूरकडे मार्गस्थ केले. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. कोयना एक्स्प्रेस दीड तास सातारा स्थानकात थांबविली होती.पुणे रेल्वे स्टेशन येथून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी सुटलेली पुणे-कोल्हापूर फास्ट डेमू तीनच्या सुमारास कोरेगाव रेल्वे स्थानकात दाखल झाली. प्रवासी चढ-उतार झाल्यानंतर लोको पायलेटने हॉर्न वाजवला, मात्र डेमू जागेवरून हालत नव्हती. लोको पायलेटने तांत्रिक दोष निर्माण झाला आहे का याची पाहणी केली, त्यानंतर तांत्रिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी पाचारण करण्यात आले. तीनपासून पाच वाजेपर्यंत डेमू येथेच थांबून होती. इंजिनच्या पंपामध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे एक्सिलेटर चालत नव्हता, अशी माहिती प्रत्यक्ष दुरुस्तीचे कामकाज पाहणाऱ्या प्रवाशांकडून मिळाली.दरम्यान, मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस पाठोपाठ साताऱ्यात दाखल झाली. कोरेगाव रेल्वे स्टेशनवर फास्ट डेमू उभी असल्याने कोयना एक्स्प्रेसला दीड तास साताऱ्यातच थांबविण्यात आले. पाच वाजता डेमू कोरेगावातून कोल्हापूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर कोयना एक्स्प्रेस कोरेगाव रेल्वे स्टेशनवर आली. दोन मिनिटे थांबा घेऊन ती कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली.
पुणे-कोल्हापूर फास्ट डेमूचे इंजिन कोरेगावात निकामी, रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:18 PM