म्हसवड : निवडणूक आचारसंहितेत अधिग्रहण केलेली जीप मुदतीत म्हसवड पालिकेस दिली नाही व निवडणूक कामाकरिता मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करून आदेश देऊनही प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिले. यामुळे म्हसवड नगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवून दहिवडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संभाजी तापकिरे याला एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड म्हसवड न्यायालयाचे न्यायाधीश जी. एम. कोल्हापुरे यांनी ठोठावला.या खटल्याची अधिक माहिती अशी की, म्हसवड पालिकेच्या २०११ चे पंचवार्षिक निवडणूक काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी कार्यालयाकडील जीपही (एमएच ११ जी ५०४७) अधिग्रहण केली होती. ती संभाजी अण्णा तापकिरे यांनीमुदतीत म्हसवड पालिकेस दिली नाही.तसेच नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कामाकरिता मतमोजणीसही तापकिरे यांची पर्यवेक्षक म्हणून टेबलक्रमांक पाचसाठी नियुक्त करून त्यासंबंधीचे लेखी आदेश त्यांना दिले होते.तरीही ते प्रशिक्षणासाठी दि. ७ फेब्रुवारी २०११ रोजी हजरच राहिले नाहीत म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी म्हसवड पालिका यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम २६, महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ चे कलम ३१ व ३५ अन्वये तसेच आचारसंहितेच्या कालावधीत लोकसेवक म्हणून त्याच्यावरील असलेले कर्तव्यांचे उल्लंघन करून निवडणूक कर्तव्य करण्यास कसूर केले. याप्रकरणी साक्षी-पुरावे पाहून न्यायालयाने एक वर्षाची सश्रम कारावास ही शिक्षा सुनावली.चार साक्षीदार तपासलेसातारा जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेशाचे उल्लंघन करून संभाजी अण्णा तापकिरे याने कसूर केले. याबाबत चार साक्षीदार त्याचेविरुद्ध न्यायालयात तपासण्यात आले.आलेले पुराव्यांच्या कागदपत्रांवरून तापकिरे यांना दोषी ठरवून म्हसवड न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश जी. एम. कोल्हापुरे यांनी तापकिरे यास एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कर्तव्यात कसूरप्रकरणी उपअभियंत्याला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 4:50 AM