उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत पुणे बाजूकडून कोल्हापूरकडे निघालेली भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने उलटी झाली. या अपघातात डॉक्टर पत्नीसह अभियंता पतीचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.अमित अप्पाजी गावडे (वय ३८), डॉ. अनुजा अमित गावडे (३५, दोघेही रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-पुणे येथील ग्रीन फिल्ड सोसायटीत राहणारे अमित गावडे व त्यांची पत्नी डॉ. अनुजा हे दोघेजण शनिवारी सकाळी कारने (एमएच १२ जेयू ८८९२) पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले होते.
महामार्गावर वाहने कमी प्रमाणात असल्यामुळे भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचा भोसलेवाडी गावच्या हद्दीत कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार महामार्गाच्या दुभाजकाला धडकून कऱ्हाडकडून सातारा जाणाऱ्या लेनवर जाऊन उलटी झाली. यामध्ये कारमधील अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.गावडे दाम्पत्य कोल्हापूरमध्ये असणाऱ्या त्यांच्या मुलांना आणण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
अपघाताची माहिती समजताच उंब्रज पोलीस, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलीम देसाई, रमेश खुणे यांनी अपघातस्थळी तत्काळ धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघाताची नोंद उंब्रज पोलिसांत झाली आहे.