ओगलेवाडी : ‘अनेक दिवस रखडलेली आणि अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या शिष्यवृत्ती आणि जवाहर नवोदय प्रवेशपरीक्षा अखेर ११ आणि १२ ऑगस्ट रोजी विनासायास पार पडल्या. विविध केंद्रावरील नेटके नियोजन आणि नियोजनाप्रमाणे कार्यवाहीमुळे सहा महिने पुढे गेलेली परीक्षा पार पडली. यामुळे पालक शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षण विभागाने ही सुटकेचा निश्वास सोडला.
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे शाळा बंद केल्या. त्या पूर्णपणे पुन्हा सुरू झाल्याच नाहीत. मात्र जवाहर नवोदय प्रवेशपरीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाइन भरून ठेवले होते. नोव्हेंबरमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. मात्र पुन्हा फेब्रुवारीपासून दुसरी लाट उसळली आणि टाळेबंदी सुरू झाली. फेब्रुवारी महिन्यात होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा होईल की नाही या बाबत शंका निर्माण झाली. पाचवीला या परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी सहावीला गेले, मात्र या परीक्षा पार पडल्या नाहीत. अखेर शासनाने ही परीक्षा ऑगस्ट महिन्यात होईल, असे जाहीर केले. मात्र अतिवृष्टीमुळे पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा तीन दिवस पुढे ढकलण्यात आली व ती १२ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय झाला.
या आदेशानुसार गुरुवारी ती परीक्षा पूर्ण झाली.
शिक्षण विभागाने कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन अतिशय काटेकोरपणे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणालाही परीक्षा केंद्राचे आवारात प्रवेश दिला जात नव्हता. तसेच दोन बाकांमधील अंतर व गर्दी होणारच नाही याची खबरदारी घेतली होती. परीक्षेच्या अगोदरच परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करून घेतले होते. यामुळे परीक्षा व्यवस्थित पार पडण्यास कोणतीही अडचण आली नाही. अनेक अडथळे पार करीत अखेर ही परीक्षा झाली. पालक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षण विभागाने ही सुटकेचा निश्वास सोडला.
चौकट
सहावीच्या विद्यार्थ्यांनी दिली पाचवीची परीक्षा
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता पाचवीसाठी असते. यावर्षी कोरोनामुळे ह्या परीक्षा मागील शैक्षणिक वर्षात पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पाचवीचे विद्यार्थी मे २०२१ मध्ये इयत्ता सहावीत गेले आहेत. मात्र पाचवीची फेब्रुवारी मार्च महिन्यात होणारी परीक्षा ही ऑगस्ट महिन्यात झाल्याने सहावीचे विद्यार्थी पाचवीची परीक्षा देत असल्याचे पहायला मिळाले.